ऑनलाईन टीम / तरुण भारत :
जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर चार-लेनच्या निर्माणाधीन बोगद्याचा काही भाग गुरुवारी रात्री कोसळला. त्यामध्ये नऊ लोक अडकले होते. बचाव पथकांनी दोन जणांना सुखरूप बाहेर काढले असून, सात जणांना वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. (Tunnel collapsed at khooni nala, jammu-shreenagar national highway in ramban)
रामबनचे पोलीस उपायुक्त मसरतुल इस्लाम म्हणाले, रामबनच्या मेकरकोट भागात जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरील खूनी नाल्यावर चार लेनच्या बोगद्याचे काम सुरू आहे. गुरुवारी रात्री तपासणीवेळी या बोगद्याचा छोटासा भाग कोसळला. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि लष्कराने तातडीने संयुक्त बचाव मोहीम सुरू केली. एकूण 9 जण या बोगद्यात अडकले होते. त्यामधील दोन जणांना वाचवण्यात यश आले आहे. तर सात जण अद्याप बोगद्यात अडकले असून, त्यांना वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
घटनेवेळी बोगद्यात बुलडोझर आणि ट्रकसह अनेक मशिन आणि वाहने उभी होती. ही वाहनेही ढिगाऱ्याखाली गाडली गेल्याने मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, निनाहीन बोगद्यात झालेल्या अपघातामुळे बचाव मोहिमेमुळे जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आला आहे.