मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर चिपळूण शहरात बांधकाम सुरू असलेला उ•ाणपूल सोमवारी दुपारी कोसळला व कोकणात सुरू असलेल्या चौपदरीकरणातील निकृष्ट कामांचा फुगा फुटला. याच कामांवर जनता आक्षेप घेत असताना त्याकडे डोळेझाक करणारी नेतेमंडळी पूल कोसळल्यानंतर घटनास्थळी धावून आरोप-प्रत्यारोप करू लागली. तर जनक्षोभ टाळण्यासाठी की काय बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी चक्क पहाटे साडेपाच वा. कोसळलेल्या पुलाची पाहणी केली. त्यामुळे हा प्रकार म्हणजे ‘क्रांतीवीर’ सिनेमातील नाना पाटेकर यांच्या ‘तुम आये हो मेरे मौत का तमाशा देखने… देखो… तमाशा देखो…’ या संवादाप्रमाणे नियोजनपूर्व ठोस कार्यवाहीपेक्षा आपत्तीपश्चात ‘बघ्याची’ भूमिका घेणाऱ्या राजकीय नेतृत्व व प्रशासनाचा ‘तमाशा’ ठरला आहे.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणात चिपळूण शहरातून उभारण्यात येत असलेल्या कोकणातील सर्वात मोठ्या उ•ाणपुलाला सोमवारी सकाळी 7.30 वा. मोठा आवाज होत तडा गेला. त्यामुळे नागरिकांसह प्रशासकीय यंत्रणा हबकली असतानाच दुपारी 2.45 वा. उभारण्यात आलेल्या लाँचर यंत्रणेसह पूलच कोसळला. आमदार शेखर निकम व कार्यकर्ते यांच्या पाहणीप्रसंगीच ही दुर्घटना घडली. यामध्ये सारेजण थोडक्यात बचावले असले तरी झालेल्या धावपळीत निकम यांच्यासह चौघेजण जखमी झाले. पेढे-परशुराम ते खेरशेत या 36 कि.मी.च्या चौपदरीकरणात चिपळूण टप्प्यातील काम ईगल इन्फ्रा ही कंपनी करीत आहे. चिपळूण शहरातून जात असलेल्या बहाद्दूरशेखनाका ते युनायटेड हायस्कूल या 1.85 कि.मी.च्या कोकणातील सर्वात मोठ्या लांबीच्या उ•ाणपुलांतर्गत एकूण 46 पिलरपैकी सहाव्या पिलरपर्यंतचे काम पूर्ण होत आले होते. अशातच दुर्घटना घडल्यानंतर नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.
महामार्ग व कंपनी अधिकाऱ्यांच्या मते सकाळी पुलाला तडा गेला हा टेस्टिंगचाच भाग होता. प्रत्येक ब्लॉकला दोन्ही बाजूंना हायड्रोलिक टेन्शन लावून जवळपास आठ दिवस तपासणी होत असते व पुलावरून जेवढी वाहनं जातात त्याच्याही पेक्षा पाचपट लोड दिला जातो व सर्व पद्धतीने ही तपासणी होत असते जेणेकरून कुठेही काही गुणवत्तेमध्ये दोष आढळल्यास तो पीस ताबडतोब बदलता येईल व तसाच प्रकार आज करण्यात आलेला असल्याचे सांगण्यात आले. मात्र या दुर्घटनेनंतर महामार्ग चौपदरीकरणातील कामांबाबत अनेक सवाल उपस्थित केले जाऊ लागले आहेत.
उ•ाणपूल कोसळल्यानंतर ज्या पध्दतीने राजकीय नेतेमंडळी, त्यांच्या कार्यकर्त्यांनी धाव घेत जी कृती केली ती ‘क्रांतीवीर’ सिनेमातील नाना पाटेकर च्या ‘तुम आये हो मेरे मौतका तमाशा देखने… देखो… तमाशा देखो… मै फाँसीपर लटक जाऊंगा… तुम ताली बजाओंगे…. घर चले जाओगे…’ या डायलॉगप्रमाणे भासत आहे. गेल्या 12 वर्षांपासून हा महामार्ग रखडला आहे. मात्र एकाही नेत्याला तो का रखडला याची जराही लाज-लज्जा दिसत नाही. विशेषत: रत्नागिरी जिल्ह्यातील नेतेमंडळींच्या भूमिकेबाबत जनतेत तीव्र संतापाची भावना आहे. सिंधुदुर्गतील महामार्ग पूर्ण होतो, तर मग रत्नागिरी जिल्ह्यात घोडे का अडते, असा थेट सवाल जनता विचारताना दिसत आहे. रत्नागिरीतील महामार्ग टक्केवारीत अडकला असल्याचा आरोप आता खुलेआम केला जाऊ लागला आहे. तसे पाहिले तर रस्त्यावर काँक्रिटीकरण झाल्यावर अंथरणाऱ्या बारदानापासून, पाणी मारण्यापासून कंत्राटे राजकीय कम पुढारी ठेकेदारांना वाटण्यात आली. या राजकीय ठेकेदारांनीच पुरती वाट लावली असल्याचे शिंथोडे आता उडवले जात आहेत.
उ•ाणपूल कोसळल्याने आता महामार्गातील चौपदरीकरणातील कामांचा पंचनामा नियतीनेच करून टाकला आहे. आजपर्यंत रस्त्याची बाजूची गटारे बांधत असतानाच ती ढासळत होती. रस्ते खचत होते, काँक्रिटचे थर उडाले आहेत. बहाद्दूरशेखनाका जवळील वाशिष्ठी नदीवरील पुलाचे काँक्रिट गेले वर्षभर उडून त्यातील लोखंडी सळ्या बाहेर पडल्या आहेत. स्थानिक नागरिक यावर वारंवार बोलत आले आहेत. कामातील दोष दाखवत असतानाही त्याकडे राजकीय पक्ष, त्यांचे नेते पूर्णपणे दुर्लक्ष करत राहिले आणि आता उ•ाणपूल कोसळल्यानंतर मात्र घटनास्थळी जाऊन अधिकाऱ्यांना मारहाण, अर्वाच्च शिवीगाळ तर नेत्यांची लांबलचक स्टेटमेंट व्हायरल होताना दिसू लागली आहेत. मात्र आतापर्यंत जनता कामातील दोष दाखवत असताना ही सारी नेतेमंडळी कुठल्या बिळात जाऊन बसली होती असे खेदाने विचारावेसे वाटते.
कोकणच्या रखडलेल्या महामार्गावर केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांना पुस्तक लिहावेसे वाटत आहे. किंबहुना एका जाहीर कार्यक्रमात त्यांनी तसे बोलूनही दाखवले आहे. मात्र त्याच गडकरी यांच्या खात्याच्या अधिकारी व ठेकेदार कंपन्यांची मुजोरी त्यांना का बरं दिसत नाही. मनमानीप्रमाणे कामे सुरू आहेत. कुठल्याही कामाला वेळेची मर्यादा नाही. गडकरी यांनी पुस्तक लिहिलेच तर मात्र कालच्या कोसळलेल्या उ•ाणपूलावर नवा एक धडा त्यांना वाढवावा लागणार आहे. मध्यंतरी गडकरी यांनी शिवसेनेचे आमदार अडथळा आणतात म्हणून रस्ता होत नाही असे वक्तव्य केलं होतं. त्यावर आमदार भास्कर जाधव यांनी स्वत: पत्र लिहून कोण अडथळा आणतो ते सांगा मी त्यातून मार्ग काढतो, असे सांगितले. मात्र त्यावर गडकरी यांनी उत्तरही दिलं नाही, असे जाधव सांगतात.
आता या कोसळलेल्या उ•ाणपुलाची त्रिसदस्यीय तज्ञ समिती चौकशी करणार आहे. खुद्द सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी मंगळवारी पहाटे या पुलाच्या पाहणीप्रसंगी जाहीर केले. चौकशी समितीचा अहवाल आल्यानंतर दोषींवर कडक कारवाई केली जाईल असे सांगितले. तसे पाहिले तर गणेशोत्सवापूर्वी महामार्गाची एक लेन पूर्णत्वास जावी म्हणून बांधकाम मंत्री चव्हाण यांनी महामार्ग पाहणीसाठी तब्बल नऊ दौरे केले. मात्र या दौऱ्यात पाहणी करताना त्यांना चुकीची कामे दिसलीच नाहीत का? का दिसली असली तरी त्याकडे दुर्लक्ष केले का? का निव्वळ जनतेत रोष आहे म्हणून दौऱ्याचा दिखाऊपणा केला. पूल कोसळल्यानंतर त्याची पाहणीही त्यानी पहाटे 5.30 वा. चिपळूणकर साखरझोपेत असताना केली. जनतेचा आक्रोश आणि प्रक्षोभ यांचा सामना करावा लागू नये म्हणून तर पहाटेची वेळ त्यांनी निवडली का, असे अनेक सवाल उपस्थित केले जाऊ लागले आहेत.
काहीही असो कोकणी जनता संयमी आहे आणि त्याचाच गैरफायदा या राजकारण्यांनी घेतला आहे. एक रस्ता बारा वर्षे रखडतो यातच सर्वकाही आलं. मध्यंतरी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी कोकणातील जाहीर सभेत वक्तव्य करताना कोकणातील लोकप्रतिनिधींना घरी बसवल्याशिवाय कोकण पुढे जाणार नसल्याचे सांगितले होते. 30-40 वर्षे नेतेगिरी करूनही कोकणच्या जनतेच्या नशिबी हालअपेष्टाच वाट्याला येत असतील तर नेत्यांना घरी बसवणे आवश्यक आहे. आजला ठाकरे यांच्या या वक्तव्याची प्रकर्षाने आठवण येथील जनतेला होऊ लागली आहे.
राजेंद्र शिंदे








