शहर परिसरात विवाहाची धामधूम : पूजेचे साहित्य, सजावट वस्तूंच्या मागणीत वाढ
बेळगाव : शहर परिसरात शुक्रवारपासून मंगलमय वातावरणात तुळशी विवाहाला प्रारंभ झाला आहे. दिवाळी, पाडवा, भाऊबीज नंतर आता तुळशी विवाहाची धामधूम पहावयास मिळणार आहे. तुळशी विवाह 25, 26 आणि 27 नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. शुक्रवारी शहरात विविध ठिकाणी तुळशी विवाह झाले. त्यामुळे बाजारात देखील तुळशीच्या पूजेचे साहित्य आणि सजावटीच्या वस्तूंची मागणी वाढली आहे. तुळशी विवाहानंतर लग्नाचा मुहूर्त साधला जातो. त्यामुळे तुळशी विवाहालाही अनन्य साधारण महत्त्व आहे. गुरूवारी कार्तिकी एकादशीनिमित्त दुसऱ्या दिवशी तुळशी विवाहाला प्रारंभ झाला आहे. शहरात सामूदायिक तुळशी विवाहांचे आयोजन केले जात आहे. काही जण अंगणात तर काही जण परसात तर काही जण टेरेसवर तुळशी वृंदावन ठेवून विवाह होवू लागले आहेत. त्यामुळे ऊस, पूजेचे साहित्य, तुळशी वृंदावन, फळे आणि फुलांची मागणी वाढली आहे.
पुढील तीन दिवस तुळशी विवाहाची धामधूम
विवाहाच्या पार्श्वभूमीवर बाजारात साहित्याची रेलचेल पहावयास मिळत आहे. त्याबरोबर अंगणात असलेल्या तुळशी वृंदावनाची रंगरंगोटी, सजावट देखील सुरू आहे. पुढील तीन दिवस तुळशी विवाहाची धामधूम पहावयास मिळणार आहे. शुक्रवारी सायंकाळी शहर व उपनगरांत विवाहाचा मुहूर्त साधला. त्यामुळे भक्तिमय व मंगलमय वातावरण पहावयास मिळाले.
बापट गल्ली, कार पार्किंग येथे तुळशी विवाह
सांप्रदायिक भजनी मंडळ, श्री विठ्ठल-रखुमाई सेवा संघ यांच्यावतीने शुक्रवारी तुळशी विवाह उत्साहात झाला. या निमित्ताने काकडारती झाली. श्रीकांत सांबरेकर, प्रभावती सांबरेकर यांच्या हस्ते पूजन झाले. याप्रसंगी गजानन सांबरेकर, मंजुनाथ सांबरेकर, गोपाळ सांबरेकर, प्रभाकर कणबर्गी, जगन्नाथ कामटे, महादेव चौगुले आदी उपस्थित होते.









