पुणे / प्रतिनिधी
हरिनामाच्या गजरात व टाळ मृदंगाच्या नादात संत शिरोमणी जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या पालखीचे बुधवारी दुपारी अडीचच्या सुमारास देहहून पंढरपूरकडे प्रस्थान होत आहे.
यंदाचा हा 340 वा पालखी सोहळा आहे. त्यानिमित्त संस्थानच्या वतीने प्रस्थान सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आलेली आहे. देऊळवाड्याला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली असून, मुख्य मंदिर, इंद्रायणीचा परिसर भाविकांच्या गर्दीने फुलून गेला आहे. प्रस्थान सोहळा बुधवारी दुपारी अडीच वाजता सुरू होणार आहे. या सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचीही उपस्थिती राहणार आहे. पहाटे साडेचार वाजता देऊळवाड्यात काकड आरती होईल. पाच वाजता श्री विठ्ठल ऊक्मिणी मंदिरात संस्थानच्यावतीने महापूजा होईल. साडेपाच वाजता संत तुकाराम महाराज शिळा मंदिरात महापूजा पार पडेल. सकाळी सहा वाजता वैकुंठस्थान येथील संत तुकाराम महाराज मंदिरात महापूजा करण्यात येईल. सकाळी सहा वाजता पालखी सोहळ्याचे जनक तपोनिधी नारायण महाराज समाधी मंदिरात विश्वस्तांच्या हस्ते महापूजा केली जाईल. सकाळी आठ ते नऊ यावेळेत गाथा भजनाची सांगता होईल. सकाळी दहा ते बारा या वेळेत देहूकर महाराज यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे. दुपारी बारा ते दोन या वेळेत महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडेल. इनामदारवाड्यातून संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे दुपारी दोन वाजता मुख्य देऊळवाड्यात आगमन होईल. त्यानंतर पालखी प्रस्थान सोहळ्यास दुपारी अडीच वाजता प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सुऊवात होणार आहे. सायंकाळी पाच वाजता मंदिर प्रदक्षिणा होणार असून, साडेसहा वाजता पालखी सोहळा इनामदार वाड्यात मुक्कामी असेल. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच गुऊवारी पालखी आकुर्डीच्या दिशेने मार्गस्थ होणार आहे.
माउलींच्या पालखीचे गुऊवारी प्रस्थान
संत ज्ञानेश्वर माउलींचा प्रस्थान सोहळा गुरूवारी 19 जूनला रात्री 8 वाजता होईल. आरतीचा कार्यक्रम सायंकाळी साडेसात वाजता असून त्यानंतर मानाच्या 47 दिंड्यांना देऊळवाड्यात प्रवेश दिला जाणार आहे. रात्री आठनंतर पालखीचे प्रस्थान होईल. श्री गुरू हैबतबाबांनी ठरवून दिलेल्या प्रथेप्रमाणे सोहळा पार पडेल, असे देवस्थानच्या वतीने सांगण्यात आले.
पालखी प्रस्थानाच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तांचा पाहणी दौरा
संतश्रेष्ठ श्री. ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू श्री. संत तुकाराम महाराज यांच्या आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने व्यापक नियोजन सुरू केले आहे. पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी आळंदी व देहू येथे पाहणी दौरा करून सुरक्षाव्यवस्था आणि वाहतूक नियोजनाचा आढावा घेतला. या दौऱ्यात सहआयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, गुन्हे शाखेचे उपायुक्त संदीप डोईफोडे व अन्य पोलीस अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. वारी प्रस्थानासाठी 18 जून रोजी देहू आणि 19 जून रोजी आळंदी येथे हजारो वारकरी उपस्थित राहणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर आयुक्त चौबे यांनी आळंदीतील संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर, देहूतील संत तुकाराम महाराज मंदिर, पालखी मार्ग, वाहनतळ, गर्दी नियंत्रण व्यवस्था, मनुष्यबळाचे नियोजन आणि आपत्कालीन उपाययोजनांची बारकाईने पाहणी केली. वारकऱ्यांना भक्तीमय, आनंददायी आणि सुरक्षित वातावरण मिळावे, यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. वारीच्या निमित्ताने भक्ती आणि सुरक्षेचा संगम साधत पोलिसांकडून नागरिकांच्या सहकार्याने नियोजनबद्ध तयारी सुरू आहे.








