हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत दिंडी उत्साहात : तुकोबांच्या पादुका दाखल : भरगच्च कार्यक्रम
प्रतिनिधी/ बेळगाव
जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज सदेह वैकुंठगमन सोहळ्याला शनिवारी उत्साहात प्रारंभ झाला. यानिमित्ताने अखंड गाथा पारायण सोहळ्यालाही सुरुवात झाली आहे. यानिमित्ताने शहरात भव्य दिंडी काढण्यात आली. यामध्ये हजारो वारकरी आणि महिला वारकरी सहभागी झाल्या होत्या. त्यामुळे भक्तिमय वातावरणही निर्माण झाले होते.
प्रारंभी संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पादुकांचे पूजन झाले. या दिंडीमध्ये टाळ, मृदंग आणि ज्ञानोबा तुकारामाच्या गजरात वारकरी मार्गस्थ झाले. डोक्यावर कलश घेऊन महिलाही मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. चन्नम्मा सर्कल, धर्मवीर संभाजी चौक, रामलिंगखिंड गल्ली, कपिलेश्वर उ•ाण पूल, शिवाजी गार्डन, महात्मा फुले रोड, गोवावेस, हरिमंदिर, राजहंस गल्लीमार्गे दिंडीची कार्यक्रमस्थळी सांगता करण्यात आली.
वारकरी सांप्रदायाची वैभवशाली परंपरा बेळगावनगरीतही टिकविली
तुकाराम महाराजांचे 11 वे वंशज श्री गुरू पुंडलिक महाराज देहूकर सहभागी झाले होते. ध. संभाजी चौक येथे श्री गुरू पुंडलिक महाराज देहूकर व श्रीराम सेना हिंदुस्थानचे रमाकांत केंडुसकर यांच्या हस्ते धर्मवीर संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन झाले. यावेळी देहूकर महाराज म्हणाले, वारकरी सांप्रदायाला उज्ज्वल आणि वैभवशाली परंपरा आहे. ही परंपरा बेळगावनगरीतही टिकविण्यात आली आहे. जगद्गुरु तुकोबारायांचा 375 वा सदेह वैकुंठगमन सोहळा व्हावा ही संकल्पना तीर्थक्षेत्र देहूमध्ये मांडण्यात आली होती. तुकाराम महाराजांच्या आशीर्वादानेच बेळगाव शहरातही भव्य तुकोबाराय गाथा सोहळ्याला प्रारंभ झाला आहे. यासाठी श्रीक्षेत्र देहूवरून तुकोबारायांच्या पादुका दाखल झाल्या आहेत. बेळगाव शहरात हा ऐतिहासिक सोहळा होत असून, यासाठी संत तुकोबाराय, संत नामदेव, मानकोजी महाराज यांचे वंशजही सेवा देणार आहेत. नागरिक आणि वारकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा.
आजपासून गाथा पारायण सोहळा
अनगोळ येथील एसकेई एज्युकेशन स्पोर्ट्स अकॅडमीच्या मैदानात 20 ते 27 एप्रिल दरम्यान हा अखंड गाथा पारायण सोहळा होणार आहे. यानिमित्ताने दररोज पहाटे काकड आरती, भजन, कीर्तन, प्रवचन आणि इतर कार्यक्रम होणार आहेत. विशेषत: वारकरी सांप्रदायातील मोठ्या व्यक्तींची किर्तने होणार आहेत. यामध्ये स्वामी चित्प्रकाशानंद सरस्वती, जगन्नाथ महाराज देशमुख, काडसिद्धेश्वर स्वामीजी, श्रीकांत महाराज पालकर, विवेकानंद वास्कर, संतोष सहस्त्रबुद्धे, हभप बाळू भक्तीकर, योगीराज महाराज गोसावी, ज्ञानेश्वर महाराज नामदास, गुरुनाथ महाराज औसेकर, अमृत महाराज जोशी, जयवंत बोधले, रामकृष्णदास महाराज लहवीतकर, वेदांताचार्य चंद्रशेखर महाराज देगुलकर, श्री गुरू पुंडलिक महाराज देहूकर आदींचा समावेश आहे. 27 रोजी सकाळी कालाकीर्तन आणि या सोहळ्याची सांगता होणार आहे.









