डॉ. सदानंद मोरे यांची प्रमुख उपस्थिती : सात दिवस विविध कार्यक्रम
वार्ताहर / किणये
खादरवाडी गावातील जीर्णोद्धार करण्यात आलेल्या संत तुकाराम महाराज मंदिराचा लोकार्पण सोहळा दि. 4 मार्चपासून आयोजित केला आहे. सात दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून सोहळ्याला तुकाराम महाराजांचे दहावे वंशज डॉ. सदानंद मोरे (देहूकर) यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी दानशूर मंडळींनी सढळ हस्ते मदत केली आहे. मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याची विठ्ठल-रखुमाई मंदिर कमिटीच्यावतीने जय्यत तयारी सुरू आहे. दि. 4 मार्च रोजी पहाटे 4 वाजता काकडारती, 7 वाजता ध्वजारोहण, गावातील देवदेवतांचे पूजन, सकाळी 10 ते 12 पर्यंत वास्तूशांती, दुपारी 12 वाजता कळसारोहण करण्यात येणार आहे. हा कळसारोहण कार्यक्रम मुक्तीमठाचे सिद्धेश्वर स्वामीजी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. रात्री 9 वाजता शेकीनहोसूर येथील हभप भाऊसाहेब पाटील महाराज यांचे कीर्तन, निरुपण होणार आहे.
दि. 5 रोजी पहाटे काकड आरती, त्यानंतर ध्वजारोहण, दुपारी 12 वाजता गावातील वेशीपासून मंदिरापर्यंत दिंडी मिरवणूक काढण्यात येणार आहे. या मिरवणुकीमध्ये महिलांनी कलश घेऊन सहभागी व्हावे, असे कळविण्यात आले आहे. दुपारी 2 ते 5 हरिपाठ भजन, सायंकाळी 5 वाजून 3 मिनिटे 23 सेकंदांच्या शुभमुहूर्तावर संत तुकाराम महाराज यांचे दहावे वंशज डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते मंदिराचे उद्घाटन करण्यात येणार आहे. त्यानंतर मान्यवरांचा सत्कार कार्यक्रम होईल. सायंकाळी 7 वाजता सदानंद मोरे यांचे प्रवचन, रात्री 9 वाजता महाआरती होईल.
दि. 6, 7 व 8 रोजी नियमित काकड आरती, ध्वजारोहण, रात्री महाआरती असे कार्यक्रम होणार आहेत. दि. 9 रोजी दुपारी 12 वाजता संत तुकाराम महाराज बीज सोहळा साजरा करण्यात येणार आहे. हे पूजन बिल्डिंग कंत्राटदार सौ. व श्री. भरमा कुंडेकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. त्यानंतर आरती कार्यक्रम होणार आहे. दुपारी 3 ते 5 हरिपाठ व भजन, रात्री 9 वाजता महाआरती, त्यानंतर कीर्तन, निरुपण करण्यात येणार आहे.
दि. 10 मार्च रोजी या कार्यक्रमाची सांगता होणार आहे. पहाटे काकड आरती, नित्यपूजा, त्यानंतर सकाळी 10 वाजता कालाकीर्तन, दुपारी 12 नंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे विठ्ठल-रखुमाई मंदिर कमिटी व ग्रामस्थांच्यावतीने कळविण्यात आले आहे.









