सर्व्हेमधून माहिती उघड : शाळांचा घसरत चाललेला दर्जा-पालकांच्या वाढत्या अपेक्षामुळे खासगी शिकवणीला चांगले दिवस
प्रतिनिधी /बेळगाव
सध्या सर्वत्रच खासगी ट्यूशनचे वारे वाहत आहेत. राज्यातील सरकारी शाळांमधील 78 टक्के विद्यार्थी खासगी ट्यूशनला जातात. नुकत्याच झालेल्या सर्व्हेमधून ही माहिती समोर आली. सरकारी शाळांचा घसरत चाललेला दर्जा आणि पालकांच्या वाढत्या अपेक्षा यामुळे खासगी शिकवणीला चांगले दिवस आले आहेत. परंतु यामुळे पालकांच्या खिशाला कात्री लागत आहे.
प्रथम फौंडेशनकडून करण्यात आलेल्या शिक्षण विभागाच्या वार्षिक सर्व्हेक्षणात ही माहिती समोर आली. खासगीपेक्षा सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांचा खासगी ट्यूशनवर अधिक भर आहे. विद्यार्थ्यांचा म्हणावा तितका बौद्धिक विकास होत नसल्यामुळे पालक खासगी ट्यूशनला पाठवीत आहेत. हीच परिस्थिती राहिल्यास केवळ परीक्षांसाठी विद्यार्थी शाळेत येण्याची भीती वर्तविली जात आहे.
सरकारी शाळांमधील गुणवत्ता ढासळतेय
राज्यातील सरकारी शाळांचा दर्जा दिवसेंदिवस ढासळत चालला आहे. 7 वीच्या 58 टक्के विद्यार्थ्यांना दुसरीची पुस्तकेही वाचता येत नसल्याचे या सर्वेक्षणातून समोर आले आहे. विद्यार्थ्यांना लिहिता वाचताच येत नसेल तर त्यांची शैक्षणिक प्रगती कशी होणार? मागील दोन वर्षात कोरोनामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले असल्याने विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती व्हावी, यासाठी खासगी ट्यूशनला पाठविले जात आहे.
खासगी ट्यूशनचे वाढते पेव
सध्या पहिलीपासूनच विद्यार्थी खासगी ट्यूशनला जात आहेत. शैक्षणिक गुणवत्तेपेक्षा पालकांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न असल्याने प्र्रत्येकजण ट्यूशनला पाठवत आहेत. सुऊवातीला शहरी भागात असणारे ट्यूशनचे पेव आता ग्रामीण भागापर्यंत पोहोचले आहे. गल्लीबोळात ट्यूशन सुरू केल्याने विद्यार्थी व पालक पेचात सापडतात की कोणत्या ट्यूशनला पाठवायचे. या सर्वापेक्षा शाळांमधील शिक्षणाचा दर्जा वाढविल्यास ट्यूशनची आवश्यकता भासणार नसल्याची प्रतिक्रिया पालकांमधून व्यक्त होत आहे.









