6.8 रिश्टर स्केल तीव्रतेचा मोठा धक्का
वृत्तसंस्था/ टोकियो
जपानच्या पूर्व किनाऱ्यावर रविवारी एक मोठा भूकंप जाणवला. त्याची तीव्रता 6.8 रिश्टर स्केल इतकी नोंद झाली आहे. स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी 5:03 वाजता भूकंप झाल्यानंतर अनेक छोटे-मोठे धक्केही जाणवल्यामुळे सुनामीचा इशारा जारी करण्यात आला. या भूकंपाचे केंद्र इवाते प्रांतातील यामादा शहरापासून सुमारे 126 किलोमीटर पूर्वेला 10 किलोमीटर खोलीवर होते. सदर क्षेत्र रिंग ऑफ फायर प्रदेशात असल्यामुळे अशा भूकंपीय हालचाली सामान्य आहेत.
गेल्या 24 तासात भूकंपप्रवण प्रदेशात भूकंपांची मालिका नोंदली गेली आहे. 6.8 रिश्टर स्केलच्या मुख्य भूकंपाच्या आधी 5.0 पेक्षा जास्त तीव्रतेचे पाच भूकंप झाले होते. यामध्ये 5.4, 5.6 आणि 5.1 रिश्टर स्केलचे भूकंप समाविष्ट आहेत. मुख्य भूकंपानंतर किमान 5.1 रिश्टर स्केलचा आफ्टरशॉक देखील जाणवला. भूकंपानंतर लगेचच जपान हवामान संस्थेने किनारी भागांसाठी सुनामीचा इशारा जारी केला. मियाको आणि यामादा सारख्या किनारी भागात सुमारे एक मीटर उंचीच्या लाटा येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. सुरुवातीच्या अहवालांनुसार, भूकंपामुळे कोणतेही मोठे नुकसान झाले नाही किंवा जीवितहानी झाली नाही. काही ठिकाणी हलक्या लाटा आणि भिंतींना भेगा पडल्या आहेत. अधिकारी अजूनही आफ्टर शॉक परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.









