वृत्तसंस्था/ कॅलिफोर्निया
अमेरिकेतील कॅलिफोर्निया शहर शुक्रवारी जोरदार भूकंपाने हादरले. या भूकंपाची तीव्रता 7 रिश्टर स्केल इतकी नोंद झाली आहे. या भूकंपामुळे समुद्रात सुनामी येण्याचा इशाराही देण्यात आला आहे. या भूकंपाच्या धक्क्यांमुळे घरे-इमारतीही हादरल्या. घरांच्या भिंतींना आणि रस्त्यांना भेगा पडल्या. या भूकंपाचे धक्के सॅन फ्रान्सिस्कोपर्यंत जाणवले. यापूर्वी 2022 मध्ये या शहरात 6.4 तीव्रतेचा भूकंप झाला होता. याचा केंद्रबिंदू फर्न्डेलच्या पश्चिम-नैर्त्रुत्येस सुमारे 100 किलोमीटर अंतरावर 10 किलोमीटर (6.21 मैल) खोलीवर होता.
अमेरिकन भूकंपशास्त्रज्ञांनी भूकंपाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. गुरुवारी मध्यरात्रीनंतर कॅलिफोर्नियाच्या किनारपट्टीवर मोठा भूकंप झाल्यामुळे महासागरात सुनामीचा धोका असल्याचे सांगण्यात आले. होनोलुलु येथील राष्ट्रीय हवामान सेवेच्या सुनामी इशारा केंद्राने ही माहिती जारी केली. सध्या कोणत्याही भागात मोठ्या लाटा येत नसल्या तरी समुद्रकिनाऱ्याजवळ राहणाऱ्या लोकांना सतर्क करण्यात आले आहे.









