वृत्तसंस्था/ बार्सिलोना
एटीपी टूवरील येथे सुरू असलेल्या बार्सिलोना खुल्या पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत ग्रीकच्या स्टिफॅनोस सित्सिपसने शुक्रवारी एकेरीची उपांत्य फेरी गाठताना ऑस्ट्रेलियाच्या अॅलेक्स डी मिनॉरचा पराभव केला. तसेच या स्पर्धेत स्पेनच्या द्वितीय मानांकित कार्लोस अल्कॅरेझने शेवटच्या आठ खेळाडूत स्थान मिळवताना आपल्या देशाच्या अॅग्युटचा पराभव केला.

ग्रीकच्या सित्सिपसने अॅलेक्स डी मिर्नारचा 6-4, 6-2 असा पराभव करत शेवटच्या चार खेळाडूत स्थान मिळवले. आता सित्सिपस आणि लोरेंझो मुसेटी यांच्यात शनिवारी उपांत्य फेरीचा सामना होणार आहे. इटलीच्या सिनेरने प्रकृती नादुरुस्तीमुळे स्पर्धेतून शेवटच्या क्षणी माघार घेतल्याने मुसेटीला उपांत्य फेरीसाठी पुढे चाल मिळाली. या स्पर्धेत अन्य एका सामन्यात स्पेनच्या द्वितीय मानांकित अल्कॅरेझने अॅग्युटचा 6-3, 7-5 असा पराभव करत शेवटच्या आठ खेळाडूत स्थान मिळवले.









