डॉ. ज्ञानेश्वर ऐवाळे यांची युवा रक्तदाता संघटनेला ग्वाही
ओटवणे प्रतिनिधी
सावंतवाडी उपजिल्हा रूग्ग्णालयात यापुढेही रुग्णांना चांगली व तत्पर रूग्णसेवा देण्याचा प्रयत्न असुन त्यादृष्टीने येत्या आठ दिवसांत उपजिल्हा रुग्णालयातील सर्व विभागांची बैठक घेऊन नियोजन केले जाईल. अशी ग्वाही सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक तथा स्त्रिरोगतज्ञ डॉ. ज्ञानेश्वर ऐवाळे यांनी सावंतवाडी येथील युवा रक्तदाता संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दिली.
सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षक पदाचा डॉ. ज्ञानेश्वर ऐवाळे यांनी नुकताच कार्यभार स्विकारला. यानिमित्त युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांचे स्वागत करीत शुभेच्छा दिल्या. यावेळी उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य विषयक सोयी व सुविधांबाबत चर्चा करताना डॉ ऐवाळे यांनी ही माहिती दिली.
यावेळी देव्या सुर्याजी यांनी उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय सोयी सुविधांसह रक्तपेढी व इतर रिक्त पदांबाबत लक्ष वेधल्यानंतर वैद्यकीय अधिक्षक डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे यांनी याबाबत वरीष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करून या समस्या सोडवून सोडविण्यात येतील असे सांगितले. तसेच उपजिल्हा रुग्णालयात डॉ. क्षमा देशपांडे, डॉ. मुक्तानंद गवंडळकर हे भुलतज्ञ म्हणून सेवा देत असल्याने शस्त्रक्रिया करणे शक्य होत असल्याचे सांगितले. यावेळी महेश भाट, अनिकेत पाटणकर, मेहर पडते, अर्चित पोकळे, डॉ. मुरली चव्हाण, राजू धारपवार, वसंत सावंत, साईश निर्गुण, देवेश पडते, पांडुरंग वर्दम आदी युवा रक्तदाता संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.









