कारवार-अंकोलाच्या भाजप आमदार रुपाली नाईक यांची तक्रार : पत्रकार परिषदेत दिली धमक्यांची माहिती
कारवार ; अज्ञातांकडून आपणाला जिवे मारण्याचे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती कारवार-अंकोलाच्या भाजप आमदार रुपाली नाईक यांनी आज बुधवारी येथील पत्रकार भवनात पत्रकारांशी बोलताना दिली. संपूर्ण जिल्ह्यात आज जागतिक महिला दिन साजरा केला जात असताना नाईक यांनी आपल्या जीवाला धोका असल्याची स्फोटक माहिती दिल्याने जिल्ह्यात विशेष करून राजकीय गोटात खळबळ माजली आहे. कारण यापूर्वी जिल्ह्यातील भटकळचे आमदार डॉ. यु. चित्तरंजन आणि कारवारचे आमदार वसंत असनोटीकर या दोन आमदारांची हत्या करण्यात आली आहे. आमदार नाईक पुढे म्हणाल्या, गेल्या काही वर्षांपासून माझे जीवन संपविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. गेल्या विधानसभेच्या निवडणुकीत आपणाला उमेदवारी निश्चित झाल्यापासूनच धमक्यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. कधी मेसेज पाठवून तर कधी फोन करून आपणाला धमक्या देण्यात आल्या. यापूर्वीच आपण जिल्हा पोलीसप्रमुखांकडे या अज्ञातांविरोधात रितसर तक्रार दाखल केली आहे.
निवास परिसरात जाणूनबुजून अंधार
सुरुवातीला आपणाला स्वरक्षणासाठी गनची परवानगी देण्यात आली नव्हती. त्यानंतर माझ्या सुरक्षिततेत वाढ करून गनची परवानगी देण्यात आली आहे. आता पुन्हा धमक्या दिल्या जात आहेत. आपल्या निवासाच्या परिसरातील पथदीप जाणूनबुजून बंद पाडून परिसरात काळोखाचे साम्राज्य पसरविण्याचा प्रयत्न केला जात आहे. नंबरप्लेट नसलेल्या आणि हेल्मेटने संपूर्ण चेहरा झाकून घेतलेले मोटारसायकलस्वार मोठा आवाज करीत फेऱ्या घालत आहेत. ट्रकद्वारे आपल्या वाहनाला ठोकरण्याचा अयशस्वी प्रयत्न करण्यात आला आहे. काही अज्ञातांनी वाहनातून आपला पाठलाग करण्याचा प्रयत्नही केला आहे. काही दिवसांपूर्वी केरळ आणि अन्य एका राज्यातील नोंदणी असलेल्या वाहनांनी माझा पाठलाग केला होता आणि यासंदर्भात पोलीस ठाण्याला माहितीही देण्यात आली आहे.
मुख्यमंत्र्यांना देण्यात आली माहिती
आमदार नाईक पुढे म्हणाल्या, आपणाला देण्यात येणाऱ्या धमक्यांसंदर्भात मुख्यमंत्री बसवराज बोम्माई आणि गृहमंत्र्यांना यापूर्वीच माहिती देण्यात आली आहे. तसेच जिल्हा पोलीसप्रमुख विष्णुवर्धन यांनाही माहिती देण्यात आली आहे. परिणामी आपल्या सुरक्षिततेसाठी महिला पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना आमदार नाईक म्हणाल्या, धमक्यांच्या पाठीमागे कुणाचा हात आहे, याची माहिती आपल्याला नाही. तथापि, आपले अनेक विरोधक आहेत. आपण एक महिला आमदार या नात्याने विकासकार्याला वाहून घेतले आहे. धमक्या देऊन आपणाला राजकारणातून पळवून लावण्याचे काही जणांकडून प्रयत्न केले जात आहेत. तथापि मी कुणाला घाबरत नाही. काही वर्षांच्या तुलनेत कारवार-अंकोला मतदारसंघात शांतता नांदत आहे. शांततेला सुरुंग लावण्याचे प्रयत्न केले जात आहेत. मृत्यूला आपण घाबरत नाही, असे स्पष्ट करून मृत्युपूर्वी मला विकासाचे ध्येय गाठायचे आहे, असे वक्तव्य नाईक यांनी केले आणि आपल्या तसेच बहिणीच्या मुलाचे यापूर्वी अज्ञातांनी अपहरण करण्याचा प्रयत्न केला होता, याची आठवण करून दिली.









