छत्तीसगड, राजस्थानमधील ईडीच्या कारवाईवर काँग्रेस संतप्त
निवडणुकीच्या कालावधीत छत्तीसगड आणि राजस्थानात ईडीकडून होत असलेल्या कारवाईबद्दल काँग्रेसने संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. तसेच ईडी अन् भाजप यांच्यातच आघाडी असल्याचा आरोप केला आहे. छत्तीसगडमध्ये निवडणुकीपूर्वी ईडी ज्याप्रकारे जुन्या प्रकरणी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्यावर घोटाळ्याचा आरोप करत आहे, तो एकप्रकारे प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न आहे, परंतु जनतेला सत्य माहित असल्याने तीच भाजपला याप्रकरणी चोख प्रत्युत्तर देणार असल्याचा दावा काँग्रेसचे महासचिव के.सी. वेणुगोपाल यांनी केला आहे.
महादेव अॅपद्वारे छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्याकडे पैसे पोहोचल्याची ईडी पूर्ण कहाणी निराधार आहे. पैसे दीर्घकाळापासून अन्य देशातून येत असल्यास यंत्रणा काय करत होत्या असा प्रश्न काँग्रेस महासचिव वेणुगोपाल, वरिष्ठ नेते जयराम रमेश आणि अभिषेक मनु सिंघवी यांनी पत्रकार परिषदेत विचारला आहे.
ईडीकडून ज्या महादेव अॅपप्रकरणी भूपेश बघेल यांच्यावर आरोप केले जात आहेत, त्या प्रकरणी छत्तीसगड पोलिसांनी मार्च 2022 पासून आतापर्यंत 450 जणांना अटक केली आहे. तसेच 75 जणांच्या विरोधात गुन्हे नोंदविले आहेत. आरोपींकडून मोठ्या प्रमाणात लॅपटॉप, मोबाइल फोन आणि रोख रक्कम हस्तगत करण्यात आल्याचा युक्तिवाद सिंघवी यांनी केला आहे.
निवडणुकीदरम्यान खुलासा का?
ईडी याप्रकरणी दीर्घकाळापासून तपास करत होती, मग निवडणुकीदरम्यानच हा खुलासा का करण्यात आला? ईडीने बघेल यांच्या ज्या निकटवर्तीयांच्या विरोधात कारवाई केली आहे, त्या सर्वांची प्रकरणे सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असून 22 नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार असल्याचा दावा सिंघवी यांनी केला.









