राज्य काँग्रेस प्रभारी रणदीप सुरजेवालांचा मंत्र्यांना कानमंत्र : कामगिरीचा घेतला आढावा
प्रतिनिधी/ बेंगळूर
दोन टप्प्यात राज्यातील काँग्रेस आमदारांची मते जाणून घेतलेले राज्य काँग्रेस प्रभारी आणि एआयसीसीचे मुख्य सचिव रणदीप सुरजेवाला पुन्हा बेंगळूर दौऱ्यावर आले आहेत. सोमवारपासून त्यांनी मंत्र्यांच्या कामगिरीचे मूल्यमापन सुरू केले आहे. मंगळवारी दुसऱ्या दिवशी देखील सुरजेवाला यांनी मंत्र्यांची स्वतंत्र बैठक घेऊन आमदारांना विश्वासात घेण्याचा आणि त्यांच्या निवेदनांना प्रतिसाद देण्याचा सल्ला दिला.
मागील दोन आठवड्यात राज्यातील काँग्रेस आमदारांशी सुरजेवाला यांनी दोन टप्प्यात चर्चा केली. त्यावेळी अनेक आमदारांनी मंत्र्यांच्या कार्यपद्धतीविषयी तक्रार केली होती. त्यानुसार आता सुरजेवाला यांनी मंत्र्यांशी चर्चा केली असून त्यांच्या खात्याच्या कामगिरीचा आढावाही घेत आहेत. मंगळवारी दुपारी त्यांनी पाटबंधारे मंत्री सतीश जारकीहोळी, मंत्री एस. एस. मल्लिकार्जुन, एन. एस. बोसराजू, मधू बंगारप्पा, पर्यावरण प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष नरेंद्र स्वामी यांच्याशी चर्चा केली. आमदार शरत बच्चेगौडा, खनिज फातिमा यांचीही मते त्यांनी जाणून घेतली.
दुपारनंतर महिला-बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, डॉ. एच. सी. महादेवप्पा आणि आर. बी. तिम्मापूर यांच्याशी चर्चा केली. या सर्व मंत्र्यांसोबत सुरजेवाला यांनी स्वतंत्रपणे चर्चा केली. आमदारांची कामे झाली पाहिजेत. मंत्री प्रतिसाद देत नसल्याची तक्रार आमदारांनी केली आहे. अशा तक्रारी पुन्हा येऊ नयेत, यासाठी त्यांच्या मागण्या, तक्रारींची दखल घ्यावी, असा सल्लाही त्यांनी मंत्र्यांना दिला.
सोमवारी सुरजेवाला यांनी मंत्री जमीर अहमद खान, भैरती सुरेश, रहिम खान यांच्याशी चर्चा केली. मतदारसंघांत पक्षसंघटना आणि खात्याच्या कामांचा आढावा त्यांनी घेतला. बुधवारी देखील ते इतर मंत्र्यांशी चर्चा करणार आहेत. त्यानंतर ते मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांची बैठक घेतील. यावेळी ते मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना मंत्री-आमदारांशी केलेल्या चर्चेचा तपशिल देतील, असे सांगितले जात आहे. दिल्लीला परतल्यानंतर आपला अहवाल हायकमांडकडे सादर करणार आहेत.
कामाचे मूल्यमापन नाही!
आमदारांनी आरोप केल्याने सुरजेवाला यांनी मंत्र्यांसोबत बैठक घेतली आहे. आमच्या खात्याच्या कामांची माहिती त्यांना दिली आहे. आमदारांच्या एक-दोन मागण्या पूर्ण केल्या नाही इतकेच. आमच्या कामाचे त्यांनी मूल्यमापन केलेले नाही. काही आमदारांच्या मागण्यांबाबत चर्चा केली आहे. दोन वर्षात केलेली कामे, नव्या योजना, कोणत्या क्षेत्रासाठी किती अनुदान दिले, याची माहिती दिली आहे.
– सतीश जारकीहोळी, पाटबंधारे मंत्री









