पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन : एडवांटेज आसाम 2.0 परिषदेचे उद्घाटन
वृत्तसंस्था/ गुवाहाटी
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोन दिवसांच्या आसाम दौऱ्यावर आहेत. मंगळवारी त्यांनी गुवाहाटी येथे एडवांटेज आसाम 2.0 परिषदेचे उद्घाटन केले. ही दोन दिवसीय पायाभूत अन् गुंतवणूक विषयक परिषद आहे. भारताच्या 140 कोटी जनतेवर जगाचा आज भरवसा आहे. राजकीय स्थैर्य आणि राजकीय निरंतरतेला यामुळे समर्थन मिळत असल्याचे प्रतिपादन मोदींनी यावेळी केले.
भारत सध्या स्थानिक पुरवठासाखळीला मजबूत करत आहे. भारत जगायच विविध क्षेत्रांमध्ये मुक्त व्यापार करार करत आहे. पूर्व आशियासोबत आमची संपर्कव्यवस्था आणखी विकसित होत आहे. इंडिया-मीडिल ईस्ट-युरोप इकोनॉमिक कॉरिडॉर देखील अनेक नव्या शक्यता घेऊन येत आहे. भारतावरील दृढ होत चाललेल्या जागतिक विश्वासादरम्यान आम्ही सर्व आसाममध्ये एकत्र आलो आहोत असे मोदी म्हणाले.
7 वर्षांत आसामची अर्थव्यस्था 6 पट वाढली
2018 मध्ये आसामची अर्थव्यवस्था 2.75 लाख कोटीची होती. आता ही 6 लाख कोटी रुपयांची झाली आहे. याचा अर्थ राज्यात भाजप सत्तेवर आल्यावर याची अर्थव्यवस्था 6 पट वाढली आहे. आसामला 2009-14 दरम्यान रेल्वे अर्थसंकल्पासाठी सरासरी 2100 कोटी रुपये मिळाले होते. आमच्या सरकारने आसामच्या रेल्वे अर्थसंकल्पासाठी चारपट अधिक तरतूद करत 10 हजार कोटी रुपये दिले आहेत. आसामने 2030 पर्यंत 12.44 लाख कोटी रुपयांचा जीडीपी गाठण्याचे लक्ष्य राखले आहे. आसाम हे लक्ष्य निश्चित गाठेल असा मला विश्वास आहे. राज्याच्या लोकांच्या क्षमता आणि राज्य सरकारव माझा भरवसा असल्याचे वक्तव्य मोदींनी केले.
नव्या भविष्याची सुरुवात
ईशान्येची भूमी नव्या भविष्याची सुरुवात करत आहे. एडवांटेज आसाम पूर्ण जगाला आसामशी जोडण्याचे अभियान आहे. भारत विकसित होण्याच्या दिशेने वाटचाल करत असताना पुन्हा एकदा हे ईशान्य क्षेत्र स्वत:चे सामर्थ्य दाखवून देत आहे. एडवांटेज आसामला मी याच भावनेच्या स्वरुपात पाहत आहे असे मोदी म्हणाले.
आसाम शांततापूर्ण राज्य
पंतप्रधान मोदींच्या आशीर्वादाने आम्ही 2018 मध्ये एडवांटेज आसामची सुरुवात केली होती. 2025-26 च्या अर्थसंकल्पात आसामसाठी ग्रीन फील्ड फर्टिलायजर योजनेची घोषणा आहे. 2014 नंतर आसामचा पुनर्जन्म झाला आहे. पंतप्रधानांच्या नेतृत्वात आसाम एक शांततापूर्ण राज्य ठरले आहे. हे राज्य कधी देशातील सर्वात अशांत राज्य होते, ते आता देशातील सर्वात शांत राज्य ठरल्याचे विश्वासाने म्हणू शकतो असा दावा आसामचे मुख्यमंत्री हेमंत विश्व शर्मा यांनी केला आहे.
अदानी समुहाकडून मोठी गुंतवणूक
अदानी समुहाने मंगळवारी आसाममध्ये 50 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा केली. ही गुंतवणूक विमानतळ, वीज वितरण, सिमेंट, रस्ते प्रकल्प, पायाभूत सुविधा आणि रोजगार निर्मितीत योगदान देणार आहे. पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री हेमंत विश्व शर्मा यांच्या नेतृत्वात आसाममध्ये परिवर्तन होत आहे. राज्याचा विकास घडविण्याच्या प्रवासात स्वत:च्या योगदानामुळे आम्हाला सन्मानित झाल्याचा अनुभव मिळत असल्याचे अदानी समुहाने म्हटले आहे. टाटा समुहाने देखील आसाममध्ये मोठी गुंतवणूक करण्याची घोषणा या परिषदेत केली आहे.









