ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार प्रदर्शित
बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्रींपैकी एक परवीन बाबी यांचा बायोपिक तयार केला जात आहे. 70 च्या दशकातील आघाडीच्या अभिनेत्री परवीन बाबी यांची प्रोफेशनल कारकीर्द अत्यंत प्रभावी राहिली. परंतु त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात अनेक उतारचढाव दिसून आले. आता त्यांच्यावर एक बायोपिक तयार केला जात असून यात परवीन यांची भूमिका तृप्ति डिमरी ही अभिनेत्री साकारणार आहे.
तृप्तिने या चित्रपटाच्या चित्रिकरणासाठी तारखा निश्चित केल्याचे समोर आले आहे. परवीन बाबी यांच्या बायोपिकचे दिग्दर्शन सोनाली बोस करणार आहे. सोनाली बोस यांनी याच्या चित्रिकरणाची तयारी सुरू केली आहे. परवीन बाबींचा हा बायोपिक थेट ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. नेटफ्लिक्सने या चित्रपटाचे अधिकार विकत घेतल्याचे समजते. अद्याप याच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही.
अमर अकबर एंथनी, काला पत्थर आणि सुहाग यासारख्या चित्रपटांमध्ये दिसून आलेल्या परवीन बाबी यांची कारकीर्द अत्यंत यशस्वी राहिली, परंतु त्यांचे वैयक्तिक आयुष्य दु:खपूर्ण राहिले. निधनापूर्वी त्या मानसिक समस्येला सामोऱ्या जात होत्या. महेश भट्ट आणि कबीर बेदी यासारख्या कलाकारांसोबत नात्यामुळे त्या चर्चेत राहिल्या होत्या. 2005 मध्ये त्यांचे निधन झाले होते.









