युव्रेनशी चर्चा न केल्यास छेडणार आर्थिक युद्ध
वृत्तसंस्था / वॉशिंग्टन डीसी
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आता रशियालाही गंभीर इशारा दिला आहे. रशियाने युक्रेनशी युद्ध थांबविण्यासंदर्भात चर्चा केली नाही, तर रशियाच्या विरोधात आर्थिक युद्ध छेडले जाईल. रशियाला धडा शिकविला जाईल. रशियाने हा इशारा गांभीर्याने घ्यावा, असे प्रतिपादन ट्रम्प यांनी बुधवारी केले आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी एकमेकांशी चर्चा करावी. हे युद्ध थांबण्याची आवश्यकता आहे. जर या दोन नेत्यांमधील चर्चा अपयशी ठरली, तर अमेरिका रशियाविरोधात मोठे आर्थिक युद्ध करणार आहे. माझ्या मनात अत्यंत गंभीर योजना आहेत. रशियाने याची जाणीव ठेवावी. अन्यथा परिणाम गंभीर होण्याची शक्यता आहे, असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले.
रशियाची हानी शक्य
हे युद्ध न थांबल्यास मी केवळ शब्दांचे वार करणार नाही. तर रशियाविरोधात कठोर आर्थिक उपाययोजना केल्या जातील. त्यामुळे रशियाची मोठी हानी होऊ शकते. रशियाची हानी करण्याची माझी इच्छा नाही. तथापि, माझ्यावर रशियाने तशी वेळ आणू नये. त्वरित रशियाने युव्रेनशी चर्चा करावी. ही चर्चा यशस्वी होणे आवश्यक आहे, हे दोन्ही देशांनी लक्षात घ्यावे, असा इशारा ट्रम्प यांनी दिला.
अमेरिका काय करणार ?
रशियाने ट्रम्प यांचा इशारा मानला नाही, तर अमेरिका रशियावर आर्थिक निर्बंध लावू शकते. रशियाची आर्थिक कोंडी करण्याची अमेरिकेची योजना आहे, असे सूत्रांचे म्हणणे आहे. मात्र, रशियाच्या तेलविक्रीचा लाभ युरोपलाही मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यासंबंधी अमेरिकेचे धोरण काय असणार, हा प्रश्न तज्ञांनी उपस्थित केला आहे. अमेरिकेने रशियावरचा राग भारतावर काढला, अशीही प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. भारतापेक्षाही रशियाकडून अधिक तेल चीन विकत घेतो. मात्र, चीनवर अमेरिकेने केवळ 30 टक्के व्यापार शुल्क लावले आहे. तर भारतावर ते 50 टक्के आहे. हा पक्षपात अनाकलनीय असून त्यामुळे जागतिक राजकारण असमतोल होऊ शकतात, असे अनेक आंतरराष्ट्रीय तज्ञांचे मत आहे.
रशियाला किती वेळ देणार ?
रशियाला ट्रम्प किती वेळ देणार आहेत, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी नेमका कालावधी स्पष्ट केला नाही. तथापि, रशियाने आपल्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करु नये. आमच्यावर कठोर निर्णय घेण्याची वेळ येऊ देऊ नये. आम्ही फार काळ वाट पाहणार नाही. रशियाने आणि युक्रेनने त्वरित हालचाली केल्या पाहिजेत. हे युद्ध प्रदीर्घ काळ चालविण्याचा विचार त्यांनी करु नये. अमेरिकेकडे अत्यंत कठोर योजना आहेत. त्या लागू करण्याची वेळ आमच्यावर न आल्यास ते रशियासाठी चांगले असेल, असे स्पष्ट उत्तर ट्रम्प यांनी दिले आहे.
ट्रम्प चीनसंबंधी सौम्य का ?
चीन रशियाकडून भारतापेक्षाही अधिक तेल घेत असताना अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प चीनसंबंधी सौम्य भूमिका का घेत आहेत, या प्रश्नाचे उत्तर दुर्मिळ खनिजांमध्ये दडले आहे. हे दुर्मिळ धातू इलेक्ट्रॉनिक आणि वाहन उद्योगाचा कणा आहेत. आज या धातूंचा 90 टक्के पुरवठा चीनच्या हाती आहे. अमेरिकेने चीनवर कर वाढविल्यानंतर चीनने या धातूंचा आणि त्यांच्यापासून बनणाऱ्या चुंबकांचा पुरवठा मर्यादित करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे अमेरिकेच्या वाहन आणि इलेक्ट्रॉनिक उद्योगांवर विपरीत परिणाम होणे शक्य होते. तसे होणे ट्रम्प आणि अमेरिका यांना परवडणारे नव्हते. त्यामुळे अमेरिकेने चीनसंबंधी वेगळी भूमिका घेऊन चीनवर कमी कर आकारला आहे. मात्र, यामुळे अमेरिकेचा पक्षपात उघड होत आहे, अशी टीका ट्रम्प यांच्यावर अमेरिकेतही केली जात आहे. येत्या काही महिन्यांमध्ये ही विचित्र कोंडी फुटण्याची आवश्यकता व्यक्त केली जाते.









