पंतप्रधान मोदींनी निमंत्रण दिल्याचे वक्तव्य : भारताने रशियन कच्च्या तेलाची खरेदी केली कमी
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
पुढील वर्षी भारताचा दौरा करू शकतो असे म्हणत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींसोबत माझी चर्चा चांगल्याप्रकारे सुरू असून दोन्ही देशांदरम्यान व्यापार करारावरील चर्चा पुढे सरकत असल्याचे म्हटले आहे. व्हाइट हाउसच्या ओव्हल ऑफिसमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना ट्रम्प यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींना स्वत:चा चांगला मित्र आणि चांगला व्यक्ती संबोधिले आहे.
मोदींसोबत माझी चर्चा होत असते, भारताने रशियाकडून होणारी कच्च्या तेलाची खरेदी मोठ्या प्रमाणात कमी केली आहे. पंतप्रधान मोदींनी मला भारत दौऱ्याचे निमंत्रण दिले असून मी तेथे जाण्याचा विचार करत असल्याचे उद्गार ट्रम्प यांनी काढले आहेत. पत्रकारांनी पुढील वर्षी भारत दौऱ्यावर जाणार का असा प्रश्न विचारला असता ट्रम्प यांनी स्मितहास्य करत हे घडू शकते असे उत्तर दिले आहे.
ट्रम्प यांचा पुन्हा दावा
तर ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान युद्ध आयातशुल्काची भीती दाखवून रोखल्याचा दावा केला आहे. 8 युद्धांपैकी 5-6 युद्धं मी आयातशुल्काच्या मदतीने संपविली आहेत. अण्वस्त्रसज्ज असलेले भारत आणि पाकिस्तान युद्धाच्या उंबरठ्यावर होते, 8 विमाने पाडविण्यात आली होती. अशास्थिती तुम्ही संघर्ष सुरू ठेवल्यास आयातशुल्क लादणार असल्याचे दोन्ही देशांना मी सांगितले होते. त्यानंतर 24 तासांत संघर्ष थांबला असल्याचा दावा ट्रम्प यांनी केला आहे.
क्वाड परिषद
ट्रम्प यांनी यापूर्वी चालू वर्षात होणाऱ्या क्वाड परिषदेसाठी भारत दौऱ्यावर न येण्याचा निर्णय घेतला होता असे बोलले जात आहे. रशियन कच्च्या तेलाच्या खरेदीवरून अमेरिकेने भारतावर मोठ्या प्रमाणात आयातशुल्क लादले असताना हा निर्णय घेण्यात आला होता. अमेरिकेने रशियावर दबाव टाकण्यासाठी भारतावर आर्थिक निर्बंध लादले आहेत.









