कोणताही दबाव न स्वीकारण्याची भारताची नीती
वृत्तसंस्था / वॉशिंग्टन डीसी
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी भारतावर लागू केलेले 50 टक्क्यांचे व्यापार शुल्क आज बुधवारपासून कार्यान्वित होत आहे. याचा परिणाम अमेरिकेला भारत निर्यात करत असलेल्या निर्यातीपैकी 66 टक्के वस्तू निर्यातीवर होईल, अशी शक्यता काही तज्ञांनी व्यक्त केली आहे. अमेरिकेने या व्यापारशुल्कासंदर्भात अधिसूचना प्रसारित केली आहे. प्रथम ट्रंप यांनी भारतावर 25 टक्के व्यापार शुल्क लागू केले जाईल, अशी घोषणा केली होती. तथापि, नंतर ते 50 टक्के करण्यात आले. भारत रशियाकडून कच्च्या इंधन तेलाची आयात करीत असल्याने हे वाढीव शुल्क लागू करण्यात आल्याचे ट्रंप यांचे म्हणणे आहे.
हे शुल्क भारतीय प्रमाणवेळेनुसार साधारणपणे बुधवारी दुपारी 12 वाजल्यापासून लागू होणार आहे. या वेळेच्या नंतर ज्या भारतीय वस्तू अमेरिकेला निर्यात करण्यासाठी जहाजांवर चढविण्यात येतील, त्यांच्यावर ते लागू होणार आहे. या वाढीव शुल्काचा परिणाम साधारणत: 60 अब्ज डॉलर्सच्या वस्तू निर्यातीवर होणार आहे, असे ग्लोबल ट्रेड रीसर्च इनिशिएटिव्ह (जीटीआरआय) या संस्थेचे म्हणणे आहे. वस्त्रप्रावरणे, हीरे आणि आभूषणे, सागरी अन्न, कार्पेटस्, फर्निचर इत्यादी वस्तूंच्या निर्यातीवर या शुल्काचा परिणाम होण्याची शक्यता आहे.
भारताची निर्यात कमी होणार ?
जीटीआरआयच्या म्हणण्यानुसार या शुल्कात जर लवकरात लवकर कपात झाली नाही, तर भारताची निर्यात कमी होण्याचा धोका आहे. भारताची अमेरिकेला वस्तू निर्यात 2024–2025 या आर्थिक वर्षात साधारणपणे 85 अब्ज डॉलर्सची होती. तथापि, हे शुल्क अधिक काळ राहिले तर ही निर्यात 49 अब्ज डॉलर्सपर्यंत खाली येण्याची शक्यता आहे. याचा अर्थ असा अमेरिकेला होणारी वस्तू निर्यात 36 अब्ज डॉलर्सनी कमी होण्याची शक्यता आहे. आजही 30 टक्के निर्यात शुल्कमुक्त आहे. तर वाहनांच्या सुट्या भागांवर 25 टक्के कर आहे. मात्र, इतर वस्तूंच्या निर्यातीला मोठा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
कोणाला लाभ होणार
भारताची अमेरिकेला होणारी निर्यात कमी झाल्यास चीन, व्हिएतनाम, मेक्सिको, तुर्किये, पाकिस्तान, नेपाळ, ग्वाटेमाला आणि केनिया या देशांचा लाभ होण्याची शक्यता आहे. सहा महिन्यांहून अधिक काळ ही स्थिती राहिल्यास भारताला आज अमेरिकेच्या बाजारपेठेत होणारा स्पर्धात्मक लाभ दीर्घकाळासाठी कमी होऊ शकतो. नंतरच्या काळात जरी शुल्क कमी झाले, तरीही भारताला पुन्हा अमेरिकेची बाजारपेठ मिळविण्यासाठी प्रदीर्घ काळ वाट बघावी लागू शकते, असे बोलले जाते. तथापि, काही तज्ञांच्या मते येत्या एक दोन महिन्यांमध्ये भारत आणि अमेरिका यांच्यात तडजोड होऊ शकते. ती झाल्यास निर्यातीवर फार मोठा परिणाम होणार नाही. मात्र, या घडामोडी नेमक्या कधी होतील, यासंबंधी अनिश्चितता आहे.
तेल खरेदी कमी होणार ?
भारत सध्या रशियाकडून प्रतिदिन 20 लाख बॅरल कच्चे इंधन तेल विकत घेत आहे. आगामी महिन्यांमध्ये या तेलाची खरेदी कमी होण्याची शक्यता आहे. पुढील वर्षाच्या प्रारंभापासून भारत रशियाकडून घेत असलेल्या तेलाच्या प्रमाणात घट करण्याची शक्यता आहे. तथापि, भारताने रशियन तेलाची खरेदी पूर्णत: थांबविली जाण्याची शक्यता फेटाळली आहे. भारताची ऊर्जेची आवश्यकता भागविण्यासाठी आणि भारताच्या 140 कोटी जनतेला वाजवी दरात इंधन पुरविण्यासाठी जगात जो देश आम्हाला कमी दरात तेल पुरवितो, त्याच्याकडून ते आम्ही घेणार आहोत, असे भारताने यापूर्वीच स्पष्ट केले आहे. त्यामुळे रशियाचे तेल भारतात येतच राहणार, हे स्पष्ट आहे. तथापि, त्याचे प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे. एकंदरीत, नेमके चित्र स्पष्ट होण्यासाठी काही कालावधी जावा लागणार आहे.
कोणत्या निर्यातीवर प्रामुख्याने परिणाम…
वस्त्रप्रावरणे आणि टेक्स्टाईल्स, हीरे आणि मौल्यवान आभूषणे, सागरी अन्न (कोळंबी), गालिचे, फर्निचर आणि इतर कारागिरीच्या वस्तू. काही प्रमाणात पोलाद आणि धातू, वाहनांचे सुटे भाग, विशिष्ट प्रकारचे खाद्यपदार्थ अशा वस्तूंच्या निर्यातीवर मोठ्या प्रमाणात परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.









