भारत-पाकिस्तान संघर्षात मध्यस्थीची होती इच्छा
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन डीसी
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 50 टक्के व्यापारी शुल्क लावले आहे. ही कृती त्यांनी भारताविरोधात असलेल्या त्यांच्या व्यक्तिगत रागातून केली आहे, असे प्रतिपादन अमेरिकेतील आर्थिक सेवा कंपनी ‘जेफेरीस’ने केले आहे. नुकत्याच झालेल्या भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सशस्त्र संघर्षात ट्रम्प यांना मध्यस्थ म्हणून मिरवायचे होते. आपल्यामुळे भारत-पाकिस्तान यांच्यातील समस्या सुटली, असे श्रेय त्यांना हवे होते. तथापि, भारत-पाकिस्तान यांच्यात जी शस्त्रसंधी झाली, त्यात अमेरिकेची किंवा ट्रम्प यांची कोणतीही भूमिका नव्हती, असे भारताने स्पष्ट केल्याने ट्रम्प हे भारतावर संतापले आहेत, असे या संस्थेचे म्हणणे आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यात काश्मीर प्रश्नावरुन मोठा संघर्ष गेली अनेक दशके होत आहे. हा संघर्ष नाहीसा करण्यासाठी मध्यस्थी करावी, म्हणून ट्रम्प उत्सुक आहेत. हा संघर्ष थांबविल्यास आपल्या नोबेल पुरस्कार मिळेल अशी त्यांची भावना आहे. मात्र, भारताने कोणत्याही तिसऱ्या देशाच्या मध्यस्थीला नकार दिला आहे. भारताची ही भूमिका प्रथमपासूनची आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकार हीच भारताची गेल्या 75 वर्षांपासूनची भूमिका पुढे चालवत आहेत. ट्रम्प यांना हा प्रश्न सोडविल्याचे श्रेय हवे आहे. मात्र, भारत आपल्या पारंपरिक भूमिकेशी बांधलेला असल्याने तो ट्रम्प यांना या प्रश्नात मध्यस्थी करु देत नाही. हे ट्रम्प यांच्या भारतावरच्या रागाचे मूळ कारण आहे, असे या संस्थेने आपल्या नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालात सकारण स्पष्ट केले आहे.
ट्रम्प यांना भूमिका ज्ञात, तरीही…
काश्मीरच्या प्रश्नावर भारत अन्य कोणत्याही राष्ट्राची मध्यस्थी स्वीकारणार नाही, हे ट्रम्प यांना ज्ञात आहे. तरीही त्यांचा मध्यस्थी करण्याचा प्रयत्न आहे. पाकिस्तानला भारतावर दबाव आणण्यासाठी ट्रम्प यांची मध्यस्थी हवी आहे. म्हणूनच ट्रम्प यांनी भारत-पाकिस्तान यांच्यात नुकताच झालेला संघर्ष आपल्यामुळेच थांबला, असा प्रचार चालविला आहे. हे दोन्ही देश अणुयुद्धाच्या सीमेवर पोहचले होते. तथापि, मी मध्यस्थी केल्याने अणुयुद्ध झाले नाही, असे ट्रम्प यांचे म्हणणे आहे. हे म्हणणे भारताने नाकारले असल्याने भारताला धडा शिकविण्याचा निर्धार ट्रम्प यांनी केला आहे, अशी अटकळ असल्याचे या संस्थेच्या अहवालाचे म्हणणे आहे.
दुखावला अहंकार…
या वर्षाच्या प्रारंभीच ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यात काश्मीरप्रश्नी मध्यस्थी करण्याची योजना बोलून दाखविली होती. पण भारताने याला स्पष्टपणे नकार दिला होता. त्यामुळे ट्रम्प यांचा अहंकार दुखावला गेला आहे. भारताचे नकार देणे त्यांना मानवलेले नाही. याचा परिणाम भारत आणि अमेरिकेच्या संबंधांमध्ये तणाव निर्माण होण्यात झाला आहे, अशी या संस्थेची मांडणी आहे.
आर्थिक संबंधांमध्येही तणाव
आपली कृषी बाजारपेठ अमेरिकेसाठी मोकळी करुन द्यावी, अशी अमेरिकेची भारताकडे मागणी होती. पण भारताने अमेरिकेची ही अट मानण्यासही नकार दिला. दुग्धोत्पादन उद्योगातही हाच प्रकार घडला आहे. यामुळे भारत आणि अमेरिका यांच्यातील आर्थिक संबंधही ताणले गेले आहेत. परिणामी, भारत आणि अमेरिका यांच्यातील संभाव्य व्यापारी करार रखडला आहे. चर्चेच्या अनेक फेऱ्या होऊनही हा करार अद्याप होऊ शकलेला नाही. ही सर्व परिस्थिती दोन्ही देशांमधली संबंध दुरावणारी नसली तरी तणावग्रस्त करणारी आहे. त्यामुळे दोन्ही देशांच्या संबंधांमध्ये एक विचित्र कोंडी निर्माण झाली असून ती कशी दूर होईल, यावरच दोन्ही देशांच्या संबंधांचा भविष्यकाळ अवलंबून राहणार आहे. ही कोंडी लवकरात लवकर दूर होण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी दोन्ही देशांनी प्रयत्न करणे आगत्याचे आहे, असे या संस्थेने अहवालात शेवटी स्पष्ट केले आहे.









