पुत्राच्या कंपनीचा पाकिस्तानशी मोठा करार : आसीम मुनीर यांचीही भूमिका
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे मागील अनेक दिवसांपासून भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शस्त्रसंधीचे श्रेय मिळवू पाहत आहेत. दोन्ही देशांना संघर्षाऐवजी व्यापाराचा प्रस्ताव दिल्याचा दावा ट्रम्प यांनी केला. परंतु भारताने ट्रम्प यांचे दावे फेटाळले होते. याचदरम्यान अमेरिकन कंपनी वर्ल्ड लिबर्टी फायनान्शियलच्या (डब्ल्यूएलएफ) पाकिस्तानसोबत झालेल्या कराराने सर्वांचे लक्ष वेधले आहे. डब्ल्यूएलएफ एक क्रिप्टोकरन्सी फर्म असून यात डोनाल्ड ट्रम्प यांच्या परिवाराची 60 टक्के हिस्सेदारी आहे. या व्यवहारात ट्रम्प परिवार आणि पाकिस्तानी सैन्यप्रमुख आसीम मुनीर यांच्या सहभागामुळे अमेरिकेच्या अलिकडच्या सक्रीयतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित राहिले आहे.
खासगी मालकीची अमेरिकन क्रिप्टोकरन्सी फर्म आणि सुमारे एक महिने जुया पाकिस्तानच्या क्रिप्टो कौन्सिलदरम्यान झालेल्या या करारात काही हाय-प्रोफाइल लोकांच्या हालचालींमध्ये तीव्रता दिसून आली आहे. क्रिप्टोकरन्सी आणि ब्लॉकचेनशी निगडित फायनान्शियल टेक उद्योग डब्ल्यूएलएफमध्ये अध्यक्ष ट्रम्प यांचे पुत्र एरिक आणि डोनाल्ड ज्युनियर यांच्यासोबत त्यांचे जावई जेरेड कुशनर यांची मोठी हिस्सेदारी आहे. ते सामूहिक स्वरुपात कंपनीची 60 टक्के हिस्सेदारी राखून आहेत.
पाक सैन्यप्रमुखांची भूमिका
पहलगाम हल्ल्याच्या काही दिवसांपूर्वी एप्रिलमध्ये अमेरिकन कंपनीने पाकिस्तान क्रिप्टो कौन्सिलसोबत एका आशय पत्रावर स्वाक्षरी केली. पाकिस्तान क्रिप्टो कौन्सिलची स्थापना होऊन तेव्हा केवळ एकच महिना झाला होता. डब्ल्यूएलएफने ट्रम्प यांचे मित्र स्टीव यांचे पुत्र जॅचरी विटकॉफसमवेत स्वत:च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना इस्लामाबाद येथे पाठविले होते. पाकिस्तानात त्यांचे स्वागत पंतप्रधना शाहबाज शरीफ आणि सैन्यप्रमुख आसीम मुनीर यांनी केले होते. या क्यवहारात मुनीर यांची मोठी भूमिका असल्याचे सांगण्यात येत आहे.
ट्रम्प यांचे निकटवर्तीय विटकॉफ
जॅचरी विटकॉफ यांना वॉशिंग्टन डीसीमध्ये मोठा प्रभाव असलेले व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जाते. ट्रम्प यांच्याप्रमाणेच ते न्यूयॉर्कमधील मोठे रियल इस्टेट अब्जाधीश उद्योजक आहेत. ट्रम्प यांच्या फ्लोरिडा येथील गोल्फ रिसॉर्ट मार ए लागोमध्ये नियमित स्वरुपात जाणाऱ्या लोकांपैकी ते एक आहेत. डब्ल्यूएलएफच्या पाकिस्तान सोबतच्या भागीदारीने अमेरिकन अध्यक्षांच्या भारत-पाकिस्तान तणावातील सक्रियतेवरून प्रश्न उपस्थित झाले आहेत.









