‘पुतीन पूर्णपणे वेडे झालेत : ते विनाकारण लोकांना मारताहेत’
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. रशिया-युक्रेन युद्धाबाबत भाष्य करताना त्यांनी मोठे विधान केले आहे. ट्रम्प यांनी रविवारी रात्री एका सोशल मीडिया पोस्टमध्ये रशियाच्या धोरणांचा निषेध करताना युक्रेनवरील हल्ला ‘निरपराध लोकांची निरर्थक हत्या’ बनल्याचा दावा केला. तसेच रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी नेहमीच आपले चांगले संबंध होते, परंतु आता ते बरेच बदलले आहेत. ते पूर्णपणे वेडे झाले आहेत. पूर्वीसारखे राहिले नाहीत. ते युद्धाच्या माध्यमातून विनाकारण लोकांना मारत आहेत, असे आरोपही ट्रम्प यांनी केले आहेत.
पुतीन युद्धाची ढाल करत निष्पाप नागरिकांना मारत आहेत. हे युद्ध फक्त सैनिकांपुरते मर्यादित नाही. युक्रेनियन शहरांवर क्षेपणास्त्रs आणि ड्रोन डागणे हे आता एका वेड्या नेत्याच्या कृतीसारखे दिसते. युक्रेनवरील हा अंदाधुंद हल्ला धोरणात्मक किंवा लष्करीदृष्ट्या आवश्यक नाही. उलट, हे फक्त विनाश आणि भीती पसरवण्यासाठी केले जात आहे, असेही ट्रम्प यांनी म्हटले आहे. जर पुतीन युक्रेन पूर्णपणे ताब्यात घेण्याचा विचार करत असतील तर ते रशियासाठी एक घातक चूक ठरेल, असा इशारा ट्रम्प यांनी दिला आहे. हा मार्ग रशियाला कुठेही सोडणार नाही; तो देशाला अंताकडे घेऊन जाईल असेही ते पुढे म्हणाले.
बायडेन, झेलेन्स्कीही लक्ष्यस्थानी
ट्रम्प यांनी केवळ पुतीनच नव्हे तर युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की आणि अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांच्यावरही टीका केली. झेलेन्स्कींच्या ताठर भूमिकेमुळे परिस्थिती आणखी बिकट होत आहे. तसेच बायडेन यांच्या अक्षमतेमुळे युद्धाला चालना मिळाली आहे. मी अध्यक्ष असताना हे युद्ध सुरू झालेले नाही. या युद्धाला पुतीन, झेलेन्स्की आणि बायडेन हे तिघेजण जबाबदार असल्याचा पुनरुच्चार ट्रम्प यांनी केला.









