ट्रम्प यांचा पुन्हा भारतविरोधी सूर
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताशी व्यापार करारावर वाटाघाटी करण्यास नकार दिला आहे. जोपर्यंत टॅरिफचा वाद सुटत नाही तोपर्यंत चर्चा सुरू होणार नाही, असे ट्रम्प म्हणाले. ट्रम्प यांच्या या भारतविरोधी सूरामुळे दोन्ही देशातील तणाव अद्याप मावळलेला दिसत नाही. यापूर्वी, मीडिया रिपोर्ट्समध्ये अमेरिकेच्या अधिकाऱ्यांचे एक पथक या महिन्यात भारतासोबत व्यापार करारावर चर्चा करण्यासाठी भारताला भेट देणार असल्याचे म्हटले होते.
ट्रम्प यांनी आतापर्यंत भारतावर 50 टक्के कर लावण्याची घोषणा केली आहे. त्यांनी 30 जुलै रोजी 25 टक्के कर लादला असून तो 7 ऑगस्टपासून लागू झाला आहे. त्याचवेळी, 6 ऑगस्ट रोजी कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी करून, त्यांनी भारतावरील कर आणखी 25 टक्क्यांनी वाढवला आहे. रशियासोबतच्या तेल खरेदीमुळे भारतावर ही कारवाई करण्यात आली आहे. युक्रेनविरुद्धच्या युद्धात रशिया या पैशाचा वापर करत असल्याचा संशय अमेरिकेला आहे. या अतिरिक्त कराची अंमलबजावणी 27 ऑगस्टपासून लागू होईल असे स्पष्ट करण्यात आले होते. तत्पूर्वी 25 ऑगस्ट रोजी भारत आणि अमेरिका यांच्यात अधिकारी पातळीवर व्यापारी बोलणी होणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, आता ही बोलणी होणार की नाही याबाबत संदिग्धता निर्माण झाली आहे.
चर्चा सुरूच राहतील : परराष्ट्र विभाग
दरम्यान, 7 ऑगस्टच्या रात्री जारी केलेल्या निवेदनात अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने भारताचे धोरणात्मक भागीदार म्हणून वर्णन केले. आयात शुल्क वादामुळे दोन्ही देशांमधील संबंध तणावपूर्ण असले तरी अमेरिका भारताशी स्पष्ट आणि खुल्या चर्चा करत आहे. ट्रम्प यांनी व्यापार असंतुलन आणि रशियन तेल खरेदीबद्दल त्यांच्या चिंता अगदी स्पष्टपणे व्यक्त केल्या आहेत. यासोबतच भारतावर करदेखील लावण्यात आला आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते टॉमी पिगॉट म्हणाले. याप्रसंगी त्यांनी थेट संवादाद्वारे मतभेद सोडवण्याचेही संकेत दिले.
चर्चेच्या पाच फेऱ्या पूर्ण
आतापर्यंत भारत आणि अमेरिका यांच्यात द्विपक्षीय व्यापार करारावर 5 फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. अमेरिकन अधिकारी 25 ऑगस्ट रोजी चर्चेच्या सहाव्या फेरीसाठी भारतात येणार होते. आता ट्रम्प यांच्या विधानानंतर या संभाषणाबाबतची परिस्थिती स्पष्ट नाही. दोन्ही देश सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंत व्यापार करारांचा पहिला टप्पा पूर्ण करण्याच्या दिशेने काम करत आहेत. यासोबतच, अंतरिम व्यापार कराराची शक्यता देखील शोधली जात आहे. यापूर्वीचा व्यापार कराराबाबतच्या चर्चेचा शेवटचा टप्पा वॉशिंग्टनमध्ये पार पडला होता.
भारतावर आणखी निर्बंध लादण्याचा इशारा
ट्रम्प यांनी आधीच भारतावर 50 टक्के कर लादला आहे. या करासोबतच त्यांनी भारतावर आणखी निर्बंध लादण्याचा इशारा दिला आहे. दोन दिवसांपूर्वीच पत्रकारांशी बोलताना ट्रम्प यांनी आता फक्त 8 तास झाले आहेत. अजून बरेच काही व्हायचे आहे. अनेक दुय्यम निर्बंध येणार आहेत, असे म्हटले होते. भारतावर 25 टक्के अतिरिक्त कर लादण्याबाबतच्या प्रश्नावर ट्रम्प यांनी हे उत्तर दिले होते. चीनसारखे इतर देशही रशियाकडून तेल खरेदी करत असताना अमेरिकेने फक्त भारतावरच कठोर कारवाई का केली असा प्रश्न ट्रम्प यांना विचारण्यात आला होता.









