प्रभू रामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाशकात सेना नेते उद्धव ठाकरे यांनी केलेले शक्तिप्रदर्शन म्हणजे लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी दोन हात करण्याची तयारीच म्हणावी लागेल. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना सध्या संक्रमणावस्थेतून जात आहे. निवडणूक आयोग व विधानसभाध्यक्षांनी बाजूने कौल दिल्याने एकनाथ शिंदे यांचे बळ वाढले आहे. मात्र, अद्याप न्यायालयाचा निकाल येणे बाकी आहे. हा निर्णय कालहरणाच्या चक्रात सापडू शकतो, असे मानणारा मोठा वर्ग आहे. त्या अर्थी शिंदे गट व ठाकरे सेनेतील खरी लढाई ही जनतेच्या मैदानातच असेल, हे निश्चित होय. आता ठाकरे यांनीही हे मान्य केलेले दिसते. नाशकातील एल्गार हे त्याचेच द्योतक म्हटले पाहिजे. अयोध्येतील श्रीराम मंदिरातील मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या माध्यमातून नव्या कालचक्राचा शंखनाद करण्यात आला. हाच मुहूर्त साधत पंचवटीतील काळाराम मंदिरात उद्धव ठाकरे यांनी केलेले विधीवत पूजन व रामकुंडावरील गोदापूजनही राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे. खरे तर हे सगळे धार्मिक कार्यक्रम. तथापि, कोणत्याही धार्मिक सोहळ्याला राजकीय वळण देण्याचा प्रघातच आता पडून गेलेला आहे. सगळेच पक्ष यात आघाडीवर असून, सेनाही यास अपवाद नसल्याचे दिसून येते. काही असो. मात्र, गोदापूजनाच्या वेळी झालेली शिवसैनिकांची उत्स्फूर्त गर्दी ठाकरे नावाचा ब्रँड अजूनही कायम असल्याचेच दर्शवितो. अर्थात अधिकच्या गर्दीमुळे उडालेला बोजवारा पाहता नियोजनाच्या बाबतीत सेनेने अजून कष्ट घेणेही क्रमप्राप्त ठरते. महाशिबिरासाठी सेनेने निवडलेला दिवसही अचूकच ठरावा. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनाचे औचित्य साधल्याने अधिवेशनाला वेगळे अधिष्ठान मिळवून देण्यात ठाकरे यशस्वी झाले, असे म्हणता येईल. कुणी कितीही काही म्हटले, तरी सत्तांतरानंतर ठाकरे यांच्याबाबत निर्माण झालेली सहानुभूती अजूनही संपलेली नाही. आयोगापाठोपाठ विधानसभा अध्यक्षांनीही सेनेच्या विरोधात कौल दिल्याने ठाकरे यांच्यावर अन्याय झाल्याची भावना जनमानसात मोठ्या प्रमाणात पहायला मिळते. त्याचा फायदा उठवायचा असेल, तर ठाकरे यांना महाराष्ट्र पिंजून काढावा लागणार, यात संदेह नाही. त्याची सुऊवात तर चांगली झाली, असे म्हणता येईल. या अधिवेशनात ठाकरे यांनी आपल्या मित्रपक्षावर टीका करण्याची एकही संधी सोडलेली दिसत नाही. फक्त जय श्रीराम बोलू नका. तसे वागून दाखवा, हा टोला असो वा ईडीचा कारभार, पीएमकेअर फंडाबाबत व्यक्त केलेली साशंकता असो. यातून उद्धव आक्रमक राजकारण करण्याच्या मूडमध्ये असल्याचे अधोरेखित होते. शिवसेना पळविणाऱ्या वालीचा राजकीय वध आपल्याला करायचा आहे, हे त्यांचे वक्तव्यही टोकदार ठरावे. स्वाभाविकच पुढच्या टप्प्यात ठाकरे विरूद्ध शिंदे वा ठाकरे विऊद्ध महाशक्ती ही लढाई टीपेला पोहोचणार, हे ओघाने आलेच. अर्थात ती ठाकरे यांच्याकरिता आव्हानात्मक असेल. राममंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या माध्यमातून भाजपाने देशभर वातावरणनिर्मिती केली आहे. यूपी, मध्य भारतासह महाराष्ट्रासारख्या राज्यांवर याचा मोठा प्रभाव पडल्याचे मानले जाते. स्वाभाविकच याचा लाभ भाजपाला होऊ शकतो, असे गृहीतक मांडले जाते. ते अवास्तव ठरू नये. शिंदे यांच्यापेक्षा शिवसैनिक व जनतेचा कौल अधिकतम ठाकरे यांच्या दिशेला झुकलेला आहे, असे ग्राऊंडवर जाणवत असते. मात्र, मोदी नावाची जादू शिंदे यांना तारणार का, याकडेही लक्ष ठेवावे लागेल. राज्यात सत्ता असो वा नसो. एकेकाळी महाराष्ट्राचे राजकारण शरद पवार यांच्याभोवती फिरत असे. मागच्या काही महिन्यांत उद्धव ठाकरे यांचे महत्त्व असेच वाढले आहे. ते भले सत्तेत नसतील. त्यांचा पक्ष, चिन्ह त्यांच्याकडून निसटलाही असेल. तरीही महाराष्ट्रातील विरोधकांचा नेता आज म्हणूनच तेच लोकमान्यता मिळविताना दिसतात. हा त्यांचा प्लस पॉईंट ठरावा. महाविकास आघाडीच्या संयुक्त सभांचा झंझावात निर्माण होतो, उद्धव ठाकरे राजकारणाच्या केंद्रस्थानी येतात नि अचानक या सभांना ब्रेक लागतो, यामागेही म्हणे ठाकरे यांचा वाढता प्रभाव हेच कारण आहे. सहकारी पक्षच त्यांच्याबद्दल धास्ती घेत असतील, तर शिंदे आणि कंपनीलाही केवळ महाशक्तीच्या ताकदीवर अवलंबून राहून चालणार नाही. जागा वाटपात सेनेच्या वाट्याला सर्वाधिक 22 ते 23 जागा येणार असल्याची चर्चा आहे. बहुतांश ठिकाणी सेनेने आपले उमेदवारही ठरवून टाकले आहेत. ठाकरेनिष्ठ मते, नव्याने जोडलेली मते, काँग्रेस, वंचित व शरद पवारांच्या राष्ट्रवादीची साथ यातून बेरजेचे गणित जुळून आले, तर सेनेसाठी ती मोठी गोष्ट असेल. 2014 च्या विधानसभा निवडणुकीतील लढाईत भाजपाची सरशी झाली होती. तसेच सेनेनेही आपले अस्तित्व राखून ठेवण्यात यश मिळविले होते. आता उद्धव सेना, शिंदे गट व भाजपा अशी थेट लढत असेल. त्यामुळे सामना सोपा नसेल. किंबहुना, शिवसेनेच्या अस्तित्वासाठी ही लढाई महत्त्वाची ठरणार, हे नक्की. हृदयात राम, हाताला काम, हा मुद्दा शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे पुढे करत आहेत. तो पुढे करत महागाई व जनसामान्यांच्या प्रश्नांवर सेनेला आवाज उठवावा लागेल. राजन साळवी, रवींद्र वायकर वा आदित्य ठाकरेंचे स्वीय सहाय्यक सूरज चव्हाण वा अन्यांवरील कारवाईतून सेनेला कोंडीत पकडण्याचे प्रयत्न होत आहेत. आदित्य यांच्याविरोधातही कारवाईची भाषा केली जात आहे. या पार्श्वभूमीवर तेजस ठाकरे यांनाही पुढे करण्यात येत आहे. पुढची लढाई ही मैदानावरच असणार. परंतु, विविध क्लृप्त्या वापरल्या जाणार, हे ध्यानात घ्यावे. या सगळ्याला कसे सामोरे जायचे, सातत्य कसे टिकवायचे, जनतेत जाऊन धार कशी टिकवायची, हे सेनेला दाखवून द्यावे लागेल. त्याकरिता उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासह सेनेच्या पहिल्या, दुसऱ्या फळीतील नेत्यांना जीवाचे रान करावे लागेल. हे आव्हान पेलण्यात उद्धव ठाकरे यशस्वी होतात का, याकडे देशाचे लक्ष असेल.
Previous Articleकर्पूरी ठाकूर यांना मरणोत्तर भारतरत्न जाहीर
Next Article कोळशापासून वीज उत्पादन 7 टक्क्यांनी वाढले
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









