भारत रशियन तेल खरेदी करणार नसल्याचा पुनरुच्चार
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन डीसी
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारत आता रशियासोबत तेलाचा व्यापार करणार नाही असा दावा केला आहे. त्यांनी यापूर्वी 15 ऑक्टोबर रोजी असाच दावा केला होता. मी भारतीय पंतप्रधान मोदींशी बोलल्यानंतर रशियन तेलाचा व्यापार करणार नसल्याचा शब्द त्यांनी दिला असल्याचे ट्रम्प विमानात पत्रकारांशी बोलताना म्हणाले. तसेच भारताने रशियासोबतचा तेल व्यापार वाढवल्यास आणखी अतिरिक्त टॅरिफ आकारण्याचा इशाराही त्यांनी दिला.
भारताने तेल खरेदीबाबत डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान मोदींमधील कोणत्याही संवादाला नाकारले आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी 16 ऑक्टोबर रोजी पत्रकार परिषदेत भारताची बाजू स्पष्ट करताना पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यात कोणताही संवाद झाला नसल्याचे स्पष्ट केले होते. सार्वजनिक हितांचे रक्षण करणे हे नेहमीच आमचे प्राधान्य राहिले आहे, असेही ते म्हणाले होते.
रशियावर दबावाचा प्रयत्न
अमेरिकेने रशियावर दबाव आणण्यासाठी भारतावर आर्थिक निर्बंध लादले आहेत. रशिया भारतीय तेल खरेदीतून मिळणारा पैसा युक्रेनमधील युद्धाला चालना देण्यासाठी वापरतो, असा दावा ट्रम्प यांनी वारंवार केला आहे. ट्रम्प प्रशासनाने रशियाकडून तेल खरेदी केल्याबद्दल भारताविरुद्ध केलेल्या आर्थिक कारवाईला दंड किंवा शुल्क म्हणून वर्णन केले आहे. ट्रम्प यांनी आतापर्यंत भारतावर एकूण 50 टक्के शुल्क लादले आहेत. यामध्ये 25 टक्के प्राथमिक शुल्क आणि रशियाकडून तेल खरेदीवर 25 टक्के दंड समाविष्ट आहे.









