येत्या 24 तासांमध्ये करात करणार मोठी वाढ
वृत्तसंस्था / वॉशिंग्टन डीसी
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा भारताला धमकी दिली आहे. येत्या 24 तासांमध्ये भारतावरील व्यापार शुल्कात मोठी वाढ करण्यात येईल, असे विधान त्यांनी केले आहे. भारत चांगला व्यापारी भागीदार नाही, अशी टिप्पणी त्यांनी केली असून भारताच्या रशियाशी होणाऱ्या व्यापारासंबंधी आक्षेप घेतला आहे.
ते एका वृत्तसंस्थेला मंगळवारी मुलाखत देत होते. भारत चांगला व्यापारी भागीदार नाही. कारण, ते त्यांच्या वस्तू आमच्या देशात मोठ्या प्रमाणात निर्यात करतात. मात्र, त्यांच्या मोठ्या करांमुळे आम्ही आमच्या वस्तू त्यांना अधिक प्रमाणात निर्यात करू शकत नाही. आम्ही त्यांच्यावर 25 टक्के कर लावण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, येत्या 24 तासांमध्ये या करात मोठी वाढ करण्याचा आमचा विचार आहे, अशी घोषणा त्यांनी या मुलाखतीत केली आहे.
रशियाच्या तेलासंबंधी आक्षेप
भारत रशियाकडून मोठ्या प्रमाणात इंधन तेल खरेदी करीत आहे. तसेच या तेलापैकी मोठा भाग आंतरराष्ट्रीय बाजारात विकून मोठा लाभ कमावत आहे. यामुळे रशियाचे आर्थिक बळ वाढत असून या बळावर तो देश सातत्याने युक्रेनशी युद्ध करीत आहे. त्यामुळे भारतावरच्या करात मोठ्या प्रमाणात वाढ केली जाणार आहे, असे कारण ट्रम्प यांनी या मुलाखतीत स्पष्ट केल्याचे वृत्त आहे.
भारताचे स्पष्टीकरण
भारत रशियाकडून जे तेल खरेदी करत आहे, ते आपल्या जनतेची आवश्यकता भागविण्यासाठी करीत असून लाभ कमाविण्यासाठी नव्हे. रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्धाचा प्रारंभ झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचे दर वाढू लागले होते. त्यावेळी हे तेलदर स्थिर होण्यासाठी अमेरिकेनेच भारताला रशियाकडून तेल मोठ्या प्रमाणात विकत घेण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार भारताने रशियाच्या तेलाची अधिक प्रमाणात आयात करण्यास प्रारंभ केला होता. त्यावेळी आंतरराष्ट्रीय तेलबाजाराचा विक्रीचा ओघ युरोपातील देशांकडे अधिक होता. त्यामुळे भारताला रशियाकडून तेल खरेदी करावे लागले होते. युरोपातील अनेक देशही त्यावेळी युद्धात युक्रेनच्या बाजूने होते, पण रशियाचे स्वस्त तेल खरेदी करत होते. भारताची भूमिका आपल्या जनतेच्या हितासाठी आहे, असे भारताने स्पष्ट केले आहे.
पुढे काय होणार ?
अमेरिकेने भारतावरील करात मोठी वाढ केल्यास भारत काय करणार, हा प्रश्न आता निर्माण झाला आहे. जपान आणि व्हिएतनाम यांनी अमेरिकेच्या अटी मान्य करुन त्या देशाशी व्यापार करार केले आहेत. युरोपियन महासंघानेही अमेरिकेसमोर नमते घेत करार केला आहे. भारत आणि अमेरिका यांच्यात व्यापार कराराची चर्चा बराच काळ होत आहे. पण तोडगा निघालेला नाही. आता ट्रम्प यांच्या नव्या इशाऱ्याला भारताचा प्रतिसाद काय असेल, हे लवकरच स्पष्ट होईल.









