युद्ध रोखण्यासाठी लवकरच चर्चा होणार : युक्रेनला नाटोमध्ये सामील करणार नाही
वृत्तसंस्था/वॉशिंग्टन
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन आणि युक्रेनचे अध्यक्ष वोल्दोमिर झेलेंस्की यांच्याशी फोनवरून युद्ध संपुष्टात आणण्यासंबंधी चर्चा केली आहे. ट्रम्प यांची पुतीन यांच्यासोबत जवळपास दीड तास चर्चा झाली. दोन्ही नेत्यांनी परस्परांच्या देशांचा दौरा करण्यास सहमती दर्शविली आहे. माझ्या आणि राष्ट्रपती पुतीन यांच्या प्रतिनिधिमंडळादरम्यान त्वरित चर्चा सुरू करण्यावर सहमती झाली आहे. पुतीन आणि माझी भेट सौदी अरेबियात होणार असल्याचे ट्रम्प यांनी सांगितले. तर ट्रम्प यांनी युक्रेनमध्ये नव्याने निवडणूक घेण्याची आवश्यकता असल्याचे वक्तव्य केले आहे. तर दुसरीकडे ट्रम्प प्रशासनाने युक्रेनला मोठा झटका दिला आहे. बेल्जियममध्ये नाटो मुख्यालयात अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेगसेथ यांनी अमेरिका आता युक्रेनला पूर्वीप्रमाणे मोठी आर्थिक आणि सैन्य मदत करणार नसल्याचे स्पष्ट केले. युक्रेनच्या नाटोमधील सदस्यत्वाला ट्रम्प यांचे समर्थन मिळणार नाही. युक्रेनसाठी 2014 पूर्वीच्या सीमांवर परतणे आता अशक्य आहे. अमेरिका रशियासोबत कुठल्याही शांतता करारासाठी युक्रेनमध्ये सैनिक पाठविणार नाही असे हेगसेथ म्हणाले.
ट्रम्प यांना मॉस्को दौऱ्याचे निमंत्रण
ट्रम्प यांनी विदेशमंत्री मार्को रुबियो, सीआयए संचालक जॉन रॅटक्लिफ, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मायकल वाल्ट्ज, विशेष प्रतिनिधी स्टीव विटकॉफ यांना रशियासोबतच्या चर्चेचे नेतृत्व करण्याचा निर्देश दिला आहे. तर पुतीन आणि ट्रम्प यांनी जवळपास दीड तासांपर्यंत फोनवरून चर्चा केली आणि भेटीवर सहमती व्यक्त केली. पुतीन यांनी यावेळी ट्रम्प यांना मॉस्को दौऱ्याचे निमंत्रण देखील दिले आहे.
रशियासोबत भूमी अदला-बदलीस तयार
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी माझे बोलणे झाले आहे. दोन्ही देश मिळून रशियन आक्रमकता रोखणे आणि एक स्थायी, विश्वसनीय शांतता सुनिश्चित करण्यासाठी स्वत:च्या पुढील पावलांची रुपरेषा तयार करत आहेत, असा दावा युक्रेनचे अध्यक्ष झेलेंस्की यांनी केला आहे. युक्रेन युद्ध रोखण्यासाठी रशियासोबत भूमीच्या अदला-बदलीस तयार आहे. ट्रम्प रशिया आणि युक्रेनला एका व्यासपीठावर आणण्यास यशस्वी ठरले तर हे शक्य असल्याचे झेलेंस्की यांनी एका मुलाखतीत म्हटले आहे. अमेरिकेच्या मदतीशिवाय आम्ही युद्ध लढू शकत नाही. युरोप, अमेरिकेशिवाय युक्रेनचे रक्षण करू शकतो असे काही लोक म्हणतात, परंतु हे सत्य नाही. अमेरिकेशिवाय युक्रेनचे रक्षण शक्य नाही असे झेलेंस्की यांनी नमूद पेले.
रशियन भूमीवर कब्जा
युक्रेनने ऑगस्ट 2024 मध्ये रशियाच्या कुर्स्कवर हल्ला करत सुमारे 1300 चौरस किलोमीटर भूभागावर कब्जा केला होता. परंतु रशियाने प्रत्युत्तर देत गमावलेला जवळपास निम्मा भूभाग परत मिळविला. तरीही युक्रेनचा अद्याप रशियाच्या मोठ्या भूभागावर कब्जा आहे. या भूभागाचा वापर रशियासोबत वाटाघाटी करण्यासाठी करणार असल्याचे युक्रेनचे म्हणणे आहे. तर रशियाने युक्रेनच्या क्रीमिया, डोनेट्स्क, खेरसॉन, लुगांस्क आणि जापोरीज्जियावर कब्जा केला आहे.
ट्रम्प यांचे आश्वासन
डोनाल्ड ट्रम्प यांनी शपथविधीच्या 100 दिवसांच्या आत रशिया-युक्रेन युद्ध रोखण्याचे आश्वासन दिले आहे. युक्रेनमधील ट्रम्प यांचे विशेष प्रतिनिधी कीथ केलॉग यांनी या दृष्टीकोनातून प्रयत्न चालविले आहेत. तर झेलेंस्की हे शुक्रवारी म्युनिच सुरक्षा परिषदेत अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी वेंस यांना भेटणार आहेत. वेन्स हे युक्रेनला युद्धासाठी मिळणारी अमेरिकेची मदत रोखण्यासाठी आग्रही आहेत. वेन्स यांच्याकडून युक्रेनवर युद्ध रोखण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचे मानले जाते.
सुरक्षेची हमी
कुठल्याही करारावर पोहोचण्यापूर्वी झेलेंस्की हे अमेरिकेकडून सुरक्षेची हमी इच्छित आहेत. सुरक्षेच्या हमीशिवाय रशियाला पुन्हा संघटित होण्याचा आणि नव्या हल्ल्यासाठी सज्ज होण्याचा कालावधी मिळेल अशी भीती झेलेंस्की यांना सतावत आहे. रशिया-युक्रेन सीमेवर शांतिसैन्य किंवा युक्रेनला नाटो सदस्यत्व मिळवून देण्याची मागणी झेलेंस्की यांची आहे.









