कॅपिटल हिल हिंसा प्रकरणी ठरला दोषी
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका समर्थकाला कॅपिटल हिल हिंसा प्रकरणी 22 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. दोषी ठरलेल्या व्यक्तीचे नाव एनरिक टेरियो असून तो एक प्राउड बॉयस या जहाल उजव्या विचारसरणीच्या समुहाचा माजी प्रमुख आहे. एनरिकवर 6 जानेवारी 2021 रोजी कॅपिटल हिलमध्ये हिंसा फैलावण्याच्या आरोपांतर्गत देशद्रोहाचा गुन्हा नोंदविण्यात आला होता. कॅपिटल हिंसा प्रकरणी झालेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी शिक्षा आहे. याप्रकरणी 1100 हून अधिक जणांवर गुन्हे नोंदविण्यात आले होते. यापूर्वी एनरिकचा सहकारी एथेन नॉर्डीन यांना 18 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. प्राउड बॉयस ग्रुपच्या 5 जणांना न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. अन्य तीन जणांना 10-17 वर्षांदरम्यान शिक्षा सुनावण्यात आली आहे.
अमेरिकेत 2020 मध्ये झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प पराभूत झाले होते. यानंतर ट्रम्प समर्थकांना कॅपिटल हिलला घेरून तोडफोड केली होती. याप्रकरणी एफबीआयकडून प्राउड बॉयज या ग्रूपची चौकशी करण्यात आली होती.









