रशियन अध्यक्ष पुतिन यांचे वक्तव्य
वृत्तसंस्था/मॉस्को
रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना आयातशुल्काच्या नावाखाली भारत आणि चीनला धमकावणे थांबवण्यास सांगितले आहे. भारत आणि चीन हे दोन्ही देश अमेरिकेच्या धमक्यांना घाबरणार नाहीत, असेही ते पुढे म्हणाले. चीनच्या विजय दिन परेडमध्ये सहभागी झाल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना पुतिन यांनी ट्रम्प यांना सावध करणारे विधान केले. भारत किंवा चीन या देशांशी ट्रम्प आक्रमक शैलीत बोलू शकत नाहीत, असे रशियन राष्ट्राध्यक्ष म्हणाले. भारत आणि चीनचा इतिहास हल्ल्यांनी भरलेला आहे. जर या देशांच्या कोणत्याही नेत्याने कमकुवतपणा दाखवला तर त्यांची राजकीय कारकीर्द संपुष्टात येऊ शकते, असेही त्यांनी याप्रसंगी बोलताना स्पष्ट केले. रशियाकडून तेल खरेदी करत असल्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर अतिरिक्त व्यापारशुल्क लादले आहे. या पार्श्वभूमीवर पुतिन यांचे हे विधान आंतरराष्ट्रीय पातळीवर महत्त्वाचे ठरत आहे.









