वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी रात्री अचानक देशाच्या सर्वोच्च लष्करी अधिक्रायाला पदावरून काढून टाकले. या अधिकाऱ्याचे नाव चार्ल्स सी. क्यू. ब्राउन ज्युनियर असे आहे. ते लष्कराच्या जॉइंट चीफ ऑफ स्टाफचे (जेसीएस) अध्यक्ष होते. जेसीएस हा अमेरिकेच्या संरक्षण विभागातील सर्वात वरिष्ठ लष्करी नेत्यांचा एक गट आहे. हा गट राष्ट्रपती, संरक्षण सचिव, गृह सुरक्षा परिषद आणि राष्ट्रीय सुरक्षा परिषदेला लष्करी बाबींवर सल्ला देतो. आता ट्रम्प यांनी ‘जेसीएस’चे अध्यक्ष म्हणून ब्राउन यांच्या जागी निवृत्त हवाई दल जनरल डॅन केन यांची नियुक्ती केली आहे.
2020 मध्ये सीक्यू ब्राउन यांनी ब्लॅक लाईव्हज मॅटर चळवळीला जाहीरपणे पाठिंबा दिला. कृष्णवर्णीय जॉर्ज फ्लॉइडच्या हत्येनंतर ही चळवळ सुरू झाली. सीक्यू तेव्हा हवाई दलाचे प्रमुख होते. त्यावेळी ट्रम्प राष्ट्राध्यक्ष होते. 2020 च्या निवडणुकीत ट्रम्प यांच्या पराभवात या चळवळीने मोठी भूमिका बजावली असे मानले जाते.









