युक्रेन युद्ध संपवण्याबाबत अलास्कामध्ये होणार चर्चा : भारताकडून स्वागत
वृत्तसंस्था/ वॉशिग्टन
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प 15 ऑगस्ट रोजी अलास्कामध्ये रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची भेट घेणार आहेत. ट्रम्प यांनी शुक्रवारी रात्री उशिरा सोशल मीडियावर पोस्ट करून ही माहिती दिली आहे. बैठकीशी संबंधित माहिती लवकरच दिली जाईल असे सांगतानाच पुतीन यांच्या भेटीत युक्रेन युद्ध संपवण्याबाबत चर्चा होण्याचे स्पष्ट संकेतही त्यांनी दिले. ट्रम्प यांच्या या भूमिकेबाबत भारताने स्पष्टीकरण देताना ‘आम्ही सहकार्य करण्यास तयार आहोत’ असे जाहीर केले आहे.
15 ऑगस्ट रोजी अलास्का येथे होणाऱ्या बैठकीबाबत अमेरिका आणि रशिया यांच्यात झालेल्या कराराचे भारत स्वागत करतो, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी स्पष्ट केले आहे. या बैठकीमुळे युक्रेनमध्ये सुरू असलेला संघर्ष संपुष्टात येण्याची आणि शांततेच्या शक्यतांचा मार्ग मोकळा होण्याची आशा निर्माण झाली आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेकवेळा हा युद्धाचा काळ नाही असे स्पष्ट केलेले आहे. त्यामुळेच आता रशिया-अमेरिका चर्चेला भारत पाठिंबा देतो आणि या प्रयत्नांमध्ये सहकार्य करण्यास तयार आहे, असे जयस्वाल म्हणाले.
हवाई हल्ले थांबवण्याचा प्रस्ताव मांडणार
वृत्तानुसार, रशिया हवाई हल्ले थांबवण्याचा तात्पुरता प्रस्ताव देऊ शकतो. बेलारूसचे अध्यक्ष लुकाशेन्को यांनी गेल्या आठवड्यात पुतीन यांच्याशी झालेल्या भेटीदरम्यान हा प्रस्ताव मांडला होता. जरी ही संपूर्ण युद्धबंदी नसली तरी दोन्ही बाजूंसाठी हा निर्णय दिलासादायक ठरू शकतो. सध्या रशियाने मे महिन्यापासून युक्रेनवर सर्वात मोठे हवाई हल्ले केले आहेत. यामध्ये एकट्या कीवमध्ये 72 जणांचा मृत्यू झाला आहे. ट्रम्प यांनी या हल्ल्यांना घृणास्पद म्हटले होते. युक्रेन देखील रशियन तेल शुद्धीकरण कारखाने आणि डेपोंवर हल्ले करत आहे.
अमेरिका-रशिया अध्यक्षांची शेवटची भेट 2021 मध्ये
पुतीन यांच्याशी चर्चा केल्यानंतर ट्रम्प युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांच्याशी त्रिपक्षीय चर्चा देखील करू इच्छितात. सुरुवातीच्या चर्चेत ते केवळ पुतीन यांना सामील करू इच्छितात. अमेरिका आणि रशियाच्या राष्ट्राध्यक्षांमध्ये शेवटची बैठक जून 2021 मध्ये झाली होती. त्यावेळी तत्कालीन अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन आणि पुतीन यांची जिनिव्हा येथे भेट झाली होती.
ट्रम्प यांचे विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ यांनी बुधवारी पुतीन यांची भेट घेतील होती. ट्रम्प यांनी ही बैठक महत्त्वाची असल्याचे वर्णन केले होते. दोन्ही देशांनी युक्रेन मुद्यावर चर्चा केल्याचे रशियाच्या राष्ट्राध्यक्ष कार्यालयातील क्रेमलिनचे सल्लागार युरी उशाकोव्ह यांनी सांगितले होते.
ट्रम्प यांची चारवेळा रशियन राष्ट्राध्यक्षांशी चर्चा…
12 फेब्रुवारी 2025 : ट्रम्प आणि पुतीन यांनी युक्रेन युद्ध संपवण्यासाठी चर्चा केली.
18 मार्च 2025 : दोन्ही नेत्यांनी युक्रेनमध्ये युद्धबंदी आणि शांततेबद्दल चर्चा केली.
19 मे 2025 : दोन तासांपेक्षा जास्त काळ चाललेल्या चर्चेत युक्रेन युद्धासह अनेक मुद्यांवर चर्चा.
4 जून 2025 : दोन्ही नेत्यांनी युक्रेन आणि इराणच्या मुद्यावर तासभर चर्चा केली.









