वृत्तसंस्था/वॉशिंग्टन
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी संरक्षण विभागाला (पेंटागॉन) त्वरित अणुशस्त्र चाचणी पुन्हा सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. ही चाचणी चीन आणि रशियाच्या बरोबरीने असावी, असेही ट्रम्प यांनी म्हटले आहे. अमेरिकेने शेवटची अणुचाचणी 23 सप्टेंबर 1992 रोजी केली होती. ही अमेरिकेची 1,030 वी चाचणी होती. रेडिएशन पसरण्यापासून रोखण्यासाठी ही चाचणी रेनियर मेसा पर्वताच्या 2,300 फूट खाली नेवाडा चाचणी स्थळावर घेण्यात आली होती. या चाचणीला डिव्हायडर असे सांकेतिक नाव देण्यात आले होते. या चाचणीवेळी झालेल्या स्फोटामुळे जमिनीखालील खडक वितळले होते. या चाचणीमुळे निर्माण झालेले 150 मीटर रुंद आणि 10 मीटर खोल असलेले विवर अजूनही दिसते.









