पत्रकाराच्या प्रश्नाला ‘माहीत नाही’ असे दिले उत्तर
वृत्तसंस्था / वॉशिंग्टन डीसी
भारताने रशियाकडून इंधन तेल घेणे थांबविले नाही, तर भारतावर मोठ्या प्रमाणात अतिरिक्त कर लावण्यात येतील, असा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे. अमेरिका भारताला रशियाकडून तेल घेण्यापासून रोखत आहे. पण स्वत: अमेरिका रशियाकडून युरेनियम, पॅलाडियम आदी अनेक वस्तू विकत घेत आहे, असे प्रत्युत्तर भारताने दिले आहे. यासंबंधी पत्रकाराने ट्रम्प यांना प्रश्न विचारला असता, त्यांनी ‘माहीत नाही’ असे आश्चर्यकारक उत्तर दिले.
सध्या पत्रकाराचा हा प्रश्न आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी त्याला दिलेले उत्तर गाजत आहे. अमेरिका स्वत:च रशियाकडून मोठ्या प्रमाणात इंधनसाहित्य आणि इतर वस्तू विकत घेत आहे, असे भारताचे म्हणणे आहे. यावर आपली प्रतिक्रिया काय आहे, असा प्रश्न ट्रम्प यांना विचारण्यात आला होता. अमेरिका आजही रशियाकडून युरेनियम किंवा खते यांसारख्या वस्तू आयात करीत आहे, यासंबंधी आपल्याला माहिती नाही. याची माहिती घ्यावी लागेल, असे उत्तर त्यांनी दिले.
व्यापार किती प्रमाणात
अमेरिका आणि रशिया यांच्यातील व्यापार 2024 मध्ये 5.2 अब्ज डॉलर्सचा झाला होता. यापैकी वस्तूंचा व्यापार 3.5 अब्ज डॉलर्सचा होता. अमेरिकेने रशियाला केलेली निर्यात 52.83 कोटी डॉलर्सची होती. तर अमेरिकेने रशियाकडून केलेली आयात 3 अब्ज डॉलर्सची होती. त्यामुळे या व्यापारात अमेरिकेची तूट 2.4 अब्ज डॉलर्सची होती. 2025 च्या पहिल्या सहामाहीत अमेरिकेने रशियाला केलेल्या निर्यातीच्या प्रमाणात घट होऊन ते 2.5 अब्ज डॉलर्स इतके होते. 2024 मध्ये अमेरिकेने रशियाकडून 1.27 अब्ज डॉलर्सची खते आयात केली होती. 62.40 कोटी डॉलर्सचे युरेनियम आणि प्लुटोनियमही आयात केले होते. अमेरिकेने रशियाकडून 87.80 कोटी डॉलर्सचे पॅलाडियमही आयात केले होते.
जीटीआरआयचा अहवाल
ग्लोबल ट्रेड रीसर्च इनिशिएटिव्ह (जीटीआरआय) या संस्थेनेही ट्रम्प यांच्या विधानांवर आक्षेप नोंदविला आहे. रशियाकडून तेल आयात केल्यामुळे ट्रम्प भारताला दोष देत आहेत. तथापि, चीनने रशियाकडून भारतापेक्षाही अधिक तेल खरेदी केले आहे. त्यासंबंधात ट्रम्प काहीच बोलत नाहीत, ही विसंगती या संस्थेने स्पष्ट केली आहे. 2024 मध्ये चीनने रशियाकडून 62.6 अब्ज डॉलर्सचे इंधन तेल आयात केले आहे. तर भारताचे प्रमाण 52.7 अब्ज डॉलर्स इतके आहे.
राजकीय हेतू नाही, सुरक्षितेला महत्व
भारत रशियाकडून तेल राजकीय हेतूने घेत नाही. तर आपल्या लेकांच्या ऊर्जा सुरक्षेच्या सुनिश्चिततेसाठी घेत आहे. युरोपातील अनेक देशही रशियाकडून इंधन तेल विकत घेतात, असे प्रतिपादन भारताच्या वाणिज्य विभागाने अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आरोपांवर करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. यापुढे भारत आणि अमेरिका यांचे व्यापारी संबंध कोणती दिशा घेतात हे येत्या काही महिन्यांमध्येच स्पष्ट होईल, असे अनेक अर्थतज्ञांचे मत आहे.









