भारत-पाकिस्तानचा हा प्रश्न असल्याचे दिले संकेत
वृत्तसंस्था/वॉशिंग्टन डीसी
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काश्मीरप्रश्नी आता मवाळ भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ‘सिंदूर’ अभियानाच्या माध्यमातून पाकिस्तानला जबर दणका दिला होता. त्यानंतर पाकिस्तानच्या विनंतीवरून भारताने शस्त्रसंधी स्वीकारली होती. तथापि, डोनाल्ड ट्रम्प यांनी या शस्त्रसंधीचे श्रेय स्वत:कडे घेताना माझ्या मध्यस्थीमुळे अणुयुद्धाचा धोका टळल्याचे प्रतिपादन केले होते. तथापि, गुरुवारी त्यांनी आपली भूमिका सौम्य केल्याचे दिसून आले आहे. शस्त्रसंधी भारत आणि पाकिस्तानच्या नेतृत्वाने समंजसपणा दाखविल्यानेच झाली, असे स्पष्ट विधान त्यांनी केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॅनडाच्या निमंत्रणावरून जी-7 परिषदेत भाग घेतला होता. ट्रम्पही या परिषदेच्या पहिल्या दिवशी उपस्थित होते. तथापि, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी त्यांची चर्चा झाली नाही. काही महत्वाच्या कारणास्तव ट्रम्प ही परिषद अर्धवट सोडून अमेरिकेला परतले होते. अमेरिकेत परतल्यानंतर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क केला होता. दोन्ही नेत्यांनी 35 मिनिटे चर्चा केली. या चर्चेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्रम्प यांना ‘सिंदूर’ अभियान कसे घडले आणि नंतर शस्त्रसंधी कशी आणि कोणामुळे घडली, याचा घटनाक्रम स्पष्टपणे विषद केला होता. त्यानंतर ट्रम्प यांची भूमिका मवाळ झाली.
मध्यस्थी स्वीकारणार नाही
काश्मीरप्रश्नी भारत कोणत्याही तिसऱ्या देशाची मध्यस्थी स्वीकारणार नाही, अशी स्पष्टोक्ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्रम्प यांच्याशी बोलताना केली. तसेच भारत आणि पाकिस्तान यांच्यात नुकत्याच झालेल्या संघर्षातही कोणाचीही मध्यस्थी स्वीकारण्यात आलेली नाही. शस्त्रसंधीही कोणाच्या मध्यस्थीने झालेली नाही. भारत आणि पाकिस्तानच्या सेनाधिकाऱ्यांनी पाकिस्तानच्या विनंतीवरून शस्त्रसंधीचा स्वीकार केला आहे, ही वस्तुस्थितीही त्यांनी ट्रम्प यांना स्पष्टपणे समजावून दिली.
स्पष्टोक्तीचा योग्य परिणाम
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अध्यक्ष ट्रम्प यांच्याशी केलेल्या चर्चेत जी वस्तुस्थिती स्पष्टपणे मांडली आहे, तिचा योग्य तो परिणाम झाला आहे, असे तज्ञांचे मत आहे. ट्रम्प यांना आता वस्तुस्थिती पूर्णपणे ज्ञात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे म्हणणे त्यांनी समजून घेतले आहे. त्यांनी तशी प्रतिक्रियाही चर्चेत व्यक्त केली आहे. भारताच्या दहशतवादविरोधी भूमिकेला अमेरिकेचे पूर्ण समर्थन असल्याचेही विधान अध्यक्ष ट्रम्प यांनी या चर्चेत केले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कॅनडाहून परतताना अमेरिकेत येण्याचे आमंत्रणही दिले. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पुढचे कार्यक्रम ठरले असल्याने त्यांनी आमंत्रणाचा स्वीकार केला नाही.
प्रश्न द्विपक्षीय असल्याचे मान्य?
काश्मीर प्रश्न किंवा त्याच्याशी संबंधित असणारा पहलगाम हल्ला आणि ‘सिंदूर’ अभियान आदी मुद्दे भारत आणि पाकिस्ताननेच सोडवायचे आहेत, हे ट्रम्प यांना पटल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे त्यांनी त्यांच्या नव्या विधानामध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्या नेत्यांनीच शस्त्रसंधी करुन युद्ध भडकण्याचा धोका टाळला आणि संभाव्य अणुयुद्धही टाळले, असे प्रतिपादन केले आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि असीम मुनीर यांची यासाठी प्रशंसाही मोकळेपणाने केली आहे. त्यामुळे एकंदर, अध्यक्ष ट्रम्प यांनी भूमिका आता मवाळ केल्याचे पहावयास मिळत आहे.
भारताशी व्यापार करारही होणार
अमेरिका लवकरच भारताशी व्यापक असा व्यापार करारही करेल, असे संकेत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले आहेत. व्हाईट हाऊस परिसरात पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी पुन्हा पंतप्रधान नरेंद मोदी यांच्यासंबंधात प्रशंसोद्गार काढले आहेत. दोन्ही देश एकमेकांना बलवान करण्यास कटिबद्ध आहेत अशा अर्थाचे वक्तव्यही त्यांनी केले आहे. या घटनांवरून असा अर्थ काढला जात आहे, की त्यांनी आता वस्तुस्थिती समजून घेतली आहे. त्यामुळे त्यांनी त्यांच्या भूमिकेत परिवर्तन केल्याचे संकेत दिले आहेत. ही बाब भारतासाठी दिलासादायक असून मधल्या काळात निर्माण झालेल्या शंका दूर होण्याची शक्यता आहे.
शंका दूर होण्याचा प्रारंभ
- पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यात 35 मिनिटे मनमोकळी चर्चा
- शस्त्रसंधीत कोणाचीही मध्यस्थी नसल्याची पंतप्रधान मोदी यांची स्पष्टोक्ती
- भारत भेटीच्या निमंत्रणाचा अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून झाला स्वीकार









