जन्मानंतर नागरिकत्वाचा अधिकार संपुष्टात आणणार
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
अमेरिकेचे आगामी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एका मुलाखतीत स्वत:च्या अजेंड्याचा खुलासा केला आहे. ट्रम्प यांनी पुन्हा एकदा अमेरिकेत राहत असलेल्या अवैध स्थलांतरितांना देशाबाहेर काढण्याच्या योजनेचा उल्लेख केला आहे. तसेच त्यांनी ड्रीमर्स स्थलांतरितांच्या सुरक्षेसाठी पावले उचलणार असल्याचे सांगितले आहे. ड्रीमर्स स्थलांतरित हे बालपणीच अमेरिकेत दाखल झालेले परंतु कुठलाही दस्तऐवज नसलेले लोक आहेत.
कार्यकाळाच्या पहिल्याच दिवशी मी जन्मानंतर अमेरिकेचे नागरिकत्व मिळण्याचा अधिकार संपुष्टात आणणार असल्याचे ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे. परंतु ट्रम्प यांच्या निर्णयाला कायदेशीर समस्येला सामोरे जावे लागू शकते. अमेरिकेच्या घटनेच्या 14 व्या दुरुस्तीन्रुसार अमेरिकेत जन्माला येणाऱ्या मूलाला देशाचे नागरिकत्व मिळते. भले मग त्याचे आईवडिल कुठल्याही देशाचे नागरिक असोत.
नाटोतून बाहेर पडण्याचा विचार
अध्यक्ष झाल्यावर मी नाटोमधून बाहेर पडण्याबद्दल गांभीर्याने विचार करणार असल्याचे ट्रम्प यांनी नमूद केले आहे. ट्रम्प यांच्या या योजनेमुळे अमेरिकेच्या नेतृत्वाखालील गटात सामील देशांमध्ये अस्वस्थता निर्माण होणार आहे. तसेच अबॉर्शन पिल्सवर बंदी घालणार नाही असे आश्वासन ट्रम्प यांनी मुलाखतीत दिले. फेडरल रिझर्वचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांना पद सोडण्याची सूचना करण्याचा माझा कुठलाही विचार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
कॅपिटल हिंसेच्या दोषींना माफी
अध्यक्ष होताच कॅपिटल हिल प्रकरणी दोषी ठरलेल्यांना माफ करण्यासाठी पावले उचलणार असल्याचे ट्रम्प यांनी सांगितले आहे. 2020 मध्ये ट्रम्प यांचा अध्यक्षीय निवडणुकीत पराभव झाल्यावर 6 जानेवारी 2021 रोजी त्यांच्या काही समर्थकांनी कॅपिटल हिल (अमेरिकेची संसद)मध्ये घुसून हिंसा केली होती.









