दबावाचा उपयोग होणार नसल्याची समितीची स्पष्टोक्ती
वृत्तसंस्था/ ओस्लो
7 युद्ध थांबविली असल्याने मला नोबेल शांतता पुरस्कार मिळायला हवा असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वारंवार म्हटले आहे. यातून ते नोबेल पुरस्कारासाठी आतुर असल्याचे दिसून येत असले तरीही नोबेल समितीवर याचा कुठलाच प्रभाव पडलेला नाही. आमच्यावर कुठलाच दबाव चालणार नाही. आम्ही पूर्ण स्वायत्तता आणि स्वातंत्र्यासह निर्णय घेतो असे नॉर्वेच्या नोबेल कमिटीचे सांगणे आहे. मी नोबेल पुरस्कारास पात्र असल्याचा दावा ट्रम्प यांनी अनकेदा केला आहे.
6-7 युद्धं मी थांबविली असल्याने नोबेल शांतता पुरस्कार मिळणे अपेक्षित आहे. रशिया आणि युक्रेनसोबत इस्रायल अन् हमासमधील संघर्ष रोखण्यासाठीही मी तत्पर असल्याचा दावा ट्रम्प यांनी केला आहे. एखाद्या खास उमेदवारावरून प्रसारमाध्यमांमध्ये मोठी चर्चा आहे हे सत्य आहे. परंतु यामुळे आमच्या निर्णयावर याचा प्रभाव पडणार नाही. आम्ही आमच्या मापदंडांनुसारच निर्णय घेणार आहोत. यात कुठलाही बर्हिगत घटक काम करणार नाही आणि तसेच कुठलाच दबाव उपयोगी पडणार नाही असे नोबेल कमिटीचे सचिव क्रिस्टियन बर्ग हार्पविकेन यांनी स्पष्ट केले आहे.
10 ऑक्टोबरला होणार घोषणा
यंदाच्या नोबेल पुरस्कारांची घोषणा 10 ऑक्टोबर रोजी होणार आहे. माझ्या नावाची शिफारस इस्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू आणि अझरबैजानचे अध्यक्ष इलहाम अलियेव यांनी केली असल्याचे ट्रम्प यांचे सांगणे आहे. तर पाकिस्तानचे सैन्यप्रमुख असीम मुनीर यांनीही ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार मिळावा असे वक्तव्य केले होते. परंतु यावेळी ट्रम्प यांना हा पुरस्कार मिळण्याची शक्यता खूपच कमी आहे.
31 जानेवारी नामांकनाची अंतिम मुदत
नोबेल पुरस्कारासाठी नामांकनाची अंतिम तारीख 31 जानेवारी होती. तर त्याच्या 11 दिवसांपूर्वीच ट्रम्प यांनी अमेरिकेचे अध्यक्षपद सांभाळले होते. अशास्थितीत ट्रम्प यांच्या नावाचा विचार पुढील वर्षी होण्याची शक्यता आहे.









