भारत-पाकिस्तान संघर्ष रोखल्याचा पुनरुच्चार
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा मोठा दावा करत भारत आणि पाकिस्तानमधील संघर्ष व्यापाराद्वारे रोखल्याचे वक्तव्य केले आहे. आतापर्यंत 7 मोठे संघर्ष समाप्त करविले असून याकरता मला नोबेल शांतता पुरस्कार मिळायला हवा असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. जगात अमेरिकेला आता पूर्वीपेक्षा अधिक सन्मान मिळत आहे. आम्ही शांतता करार करत असून युद्ध रोखत आहेत. आम्ही भारत आणि पाकिस्तान, थायलंड आणि कंबोडियामधील युद्ध रोखल्याचा दावा ट्रम्प यांनी अमेरिकन कॉर्नरस्टोन इन्स्टीट्यूट फाउंडर डिनरमध्ये बोलताना केला.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्ष मी व्यापाराद्वारे रोखला आहे. भारत आणि पाकिस्तानने संघर्ष केला तर आम्ही त्यांच्यासोबत कुठलाही व्यापार करणार नसल्याचे मी स्पष्ट केले होते. या दोन्ही देशांकडे अण्वस्त्रs आहेत असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. ट्रम्प यांनी आतापर्यंत 20 हून अधिक वेळा भारत-पाकिस्तान संघर्ष रोखल्याचा दावा केला आहे. तर भारताने दोन्ही देशांमधील चर्चेनंतरच संघर्ष रोखण्यात आला असून यात त्रयस्थ देशाने मध्यस्थी केली नसल्याचे स्पष्ट केले आहे.
7 युद्धांचा उल्लेख
ट्रम्प यांनी यादरम्यान 7 युद्धांचा उल्लेख केला आहे. भारत-पाकिस्तान, थायलंड-कंबोडिया, आर्मेनिया-अझरबैजान, कोसोवो-सर्बिया, इस्रायल-इराण, इजिप्त-इथियोपिया आणि रवांडा-कांगो यांच्यातील सर्व युद्ध आम्ही रोखली आहेत. यातील 60 टक्के संघर्ष केवळ व्यापाराच्या अस्त्राद्वारे रोखल्याचा ट्रम्प यांनी केला.
नोबेल पुरस्कारासाठी आग्रही
रशिया-युक्रेन यांच्यातील युद्ध संपुष्टात आणल्यास मला नोबेल शांतता पुरस्कार मिळू शकतो. मी 7 युद्धं रोखली असून आणखी एक रोखल्यावर पुरस्कार मिळेल. रशिया-युक्रेन संघर्ष थांबविणे सोपे असेल असे वाटले होते. रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांच्याबद्दल मी निराश आहे. हा संघर्ष रोखणे आव्हानात्मक ठरत असले तरीही मी कुठल्या न कुठल्या मार्गाने तो समाप्त करणार आहे. अमेरिका आता केवळ एक शक्तिशाली देश नाही, तर जगात शांततेचे प्रतीक ठरत असल्याचे वक्तव्य ट्रम्प यांनी पेले आहे.









