वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांनी डेमोक्रेटिक पार्टीच्या प्रायमरी निवडणुकीत मोठा विजय मिळविला आहे. सुपर ट्यूजडेला झालेल्या प्रायमरी निवडणुकीत केवळ एक प्रांत वगळता अन्य सर्व प्रांतांमध्ये त्यांनी विजय मिळविला आहे. तर बिडेन यांचे विरोधक डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील रिपब्लिकन प्रायमरी निवडणुकीत बहुतांश प्रांतांमध्ये विजय नोंदविला आहे. ट्रम्प यांच्या विजयानंतर निक्की हेली यांच्यावर अध्यक्षीय पदाच्या उमेदवारीच्या शर्यतीतून बाहेर पडण्यासाठी दबाव वाढला आहे.
बिडेन यांना डेमोक्रेटिक प्रायमरी निवडणुकीत केवळ सामोआ वगळता अन्य प्रांतांमध्ये यश मिळाले आहे. बिडेन हेच आता ट्रम्प यांच्यासमोरील अध्यक्षपदाचे दावेदार असणार आहेत. बिडेन यांच्या वयासंबंधी सध्या उलटसुलट चर्चा सुरू आहे. परंतु बिडेन यांनी मिळविलेला विजय पाहता अन्य कुठलाही नेता त्यांची जागा घेण्याची शक्यता दिसून येत नाही.
डोनाल्ड ट्रम्प यांनी सुपर ट्यूजडेला झालेल्या 15 प्रांतांच्या प्रायमरी निवडणुकीपैकी 11 प्रांतांमध्ये विजय मिळविला आहे. निक्की हेली यांना केवळ वेर्मोन्ट प्रांतात यश मिळाले आहे. तर ट्रम्प यांना कॅलिफोर्निया, टेक्सास, नॉर्थ कॅरोलिना, टेनेसी, अलबामा, वर्जीनिया, ओक्लाहोमा, अरकंसास, मॅसाच्युसेट्स, उटा, मिनेसोटा, कोलोराडो आणि मेन प्रांतात विजय मिळाला.
1215 डेलिगेट्सचे समर्थन आवश्यक
अमेरिकेत अध्यक्षीय पदाची उमेदवारी मिळविण्यासाठी 1215 डेलिगेट्सचे समर्थन आवश्यक असते. सुपर ट्यूजडेच्या निकालांपूर्वीच ट्रम्प यांच्याकडे 244 डेलिगेट्सचे समर्थन होते. तर हेली यांच्याकडे 43 डेलिगेट्सचे समर्थन आहे. ट्रम्प यांनी सुपर ट्युजडे निवडणुकीत जवळपास क्लीन स्वीप केल्याने त्यांची अध्यक्षपदासाठीची उमेदवारी निश्चित मानली जात आहे.









