कोल्हापूर : सच्चा आणि खऱ्या शिवसैनिकाने खोटे प्रतिज्ञापत्र सादर करायला नको होते असे मत खासदार संजय मंडलिक यांनी व्यक्त केले आहे. ठाकरे गटाने सादर केलेल्या प्रतिज्ञा पत्रांची चौकशी करण्यासाठी मुंबईतील क्राईम ब्रँचचे अधिकारी कोल्हापूरात दाखल झाले आहेत. यावर माध्यमांशी प्रतिक्रिया देताना संजय मंडलिक बोलत होते.
ते म्हणाले, ” आम्हीच खरे शिवसैनिक आहोत असे शिवसैनिकांकडून सांगण्यासाठी खोटी शपथपत्रे सादर करण्यात आली आहेत. शिवसेनेचे ७० टक्के लोकप्रतिनिधी शिंदे गटाकडे असताना ठाकरे गटाचा आपणच खरी शिवसेना हा सांगण्याचा केविलवाणा प्रकार आहे. खरी शिवसेना कोणती हे सिद्ध झालेलं आहे. सच्चा आणि खऱ्या शिवसैनिकाने खोटे प्रतिज्ञापत्र सादर करायला नको होते.”
पुढे बोलताना, ते म्हणाले, “बनावट प्रतिज्ञापत्रांबाबत न्यायालय काय निर्णय घेईलच. आम्हाला गद्दार म्हणायचं मात्र शिवसेनेचा विचार कोणी सोडला हे त्यांनीच पहावं.” असे बोलून खोटी प्रतिज्ञापत्र सादर करून भाडोत्री माणसं का गोळा करायची ? असा सवाल देखील खासदार संजय मंडलिक यांनी केला.