अमेरिकन कंपनीशी भागिदारी
बेळगाव : ट्रू जेट विमान कंपनी बेळगावमधून पुन्हा भरारी घेण्याची शक्यता आहे. अमेरिका येथील एनएस एव्हिएशन या कंपनीने हैदराबाद येथील ट्रू जेट कंपनीचा काही हिस्सा खरेदी केला असून लवकरच ही कंपनी देशातील बंद झालेल्या विमानफेऱ्या पुन्हा सुरू करणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. त्यामुळे बेळगावमधून ट्रू जेटची सेवा पुन्हा सुरू होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. हैदराबाद येथील ट्रू जेट कंपनी बेळगावमधून चार शहरांना विमानसेवा देत होती. हैदराबाद, म्हैसूर, कडप्पा, तिरुपती या शहरांना अत्यंत माफत तिकीट दरामध्ये विमानसेवा उपलब्ध होत असल्याने काही दिवसांमध्ये हजारो प्रवाशांनी ट्रू जेटने प्रवास केला. परंतु, कंपनीतील काही तांत्रिक कारणांमुळे या सेवा बंद झाल्या. याचा फटका बेळगावच्या विमान प्रवाशांना बसला. ट्रू जेट कंपनीतील काही हिस्सा आता अमेरिकेतील कंपनीने खरेदी केल्यामुळे प्रवाशांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. देशातील टू टायर व थ्री टायर शहरांना पुन्हा विमानसेवा सुरू करण्याचा विचार ट्रू जेटचा आहे. मुंबई, दिल्ली, कोलकाता, हैदराबाद या मेट्रो शहरांसह बेळगाव, म्हैसूर, तिरुपती, नाशिक, जळगाव यासारख्या थ्री टायर शहरांनाही सेवा उपलब्ध होण्याची शक्यता आहे.









