प्रेसिडेंशियल सुइटमध्ये राहण्यास दिला नकार : हॉटेलमधील नॉर्मल रुमची केली निवड : आता समोर आली माहिती
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी चालू महिन्याच्या प्रारंभी जी-20 परिषदेदरम्यान दिल्लीतील हॉटेल ललितमध्ये मोठा ड्रामा केला होता. ट्रुडो यांच्यासाठी भारताने प्रेसिडेंशियल सुइट आरक्षित केला होता, परंतु ट्रुडो यांच्या सुरक्षा पथकाने त्या सुइटमध्ये पंतप्रधानांच्या वास्तव्याला अनुमती नाकारली होती. भारताने जी-20 च्या राष्ट्रप्रमुखांचे सुरक्षा प्रोटोकॉल विचारात घेत प्रेसिडेंशियल सुइट तयार करविले होते. परंतु ट्रुडो यांनी या सुइटऐवजी साधारण रुममध्ये राहण्याचे अजब पाऊल उचलले होते.
दिल्लीतील हॉटेल ललितच्या प्रेसिडेंशियल सुइटमध्ये अॅडव्हान्स्ड सिक्युरिटी शील्ड लावण्यात आली होती. या शील्डमध्ये बुलेटप्रूफ ग्लास होता, ज्यात पॉलिकार्बोनेट प्लास्टिकचे मोठे आच्छादन होते आणि ते स्नायपर गोळ्यांना रोखू शकत होते. चोख बंदोबस्तासाठी अनेक अन्य सुरक्षा उपकरणेही बसविण्यात आली होती. परंतु ट्रुडो यांनी या सुइटमध्ये न थांबण्याचा निर्णय घेतल्याने गोंधळ उडाला होता. यामुळे भारतीय सुरक्षा यंत्रणांसमोर नवे आव्हान उभे ठाकले होते. हॉटेल ललितमध्ये कित्येक तासापर्यंत हा ड्रामा सुरू राहिला होता.
भारत आणि कॅनडाच्या सुरक्षा अधिकाऱ्यांदरम्यान चर्चेच्या अनेक फेऱ्या पार पडल्या, ज्यात सुरक्षेसाठी प्रोटोकॉलचे पालन आवश्यक असल्याची भूमिका भारताकडून मांडली गेली होती. परंतु कॅनडाच्या हट्टामुळे भारतीय अधिकाऱ्यांना माघार घ्यावी लागली होती. ट्रुडो हे हॉटेल ललितच्या एका सामान्य रुममध्ये वास्तव्यास होते. अशा प्रकरणांमध्ये अंतिम निर्णय संबंधित अतिथी आणि त्यांच्या दूतावासाचा असतो. कॅनडाच्या पथकाने साधारण रुममध्ये वास्तव्य करूनही प्रेसिडेंशियल सुइटसाठी रक्कम भरण्याचा प्रस्ताव दिला होता. ट्रुडो हे बहुधा स्वत:च्या सुरक्षा पथकाच्या निर्देशांचे पालन करत असावेत. कॅनडाच्या सुरक्षा पथकाला दोन्ही देशांमधील तणावपूर्ण संबंधांच्या पार्श्वभूमीवर भारतातील सुरक्षेसंबंधी शंका असण्याचीही शक्यता आहे.
भारतात अडकून पडले होते ट्रुडो
दिल्लीत जी-20 शिखर परिषदेनंतरही ट्रुडो यांच्याबाबतीत विचित्र प्रकार घडला होता. ट्रुडो हे सुमारे 36 तासांच्या विलंबाने कॅनडासाठी रवाना होऊ शकले होते. त्यांच्या विमानात बिघाड झाला होता. कॅनडाचे पंतप्रधान 10 सप्टेंबर रोजी रात्री कॅनडासाठी रवाना होणार होते. परंतु तांत्रिक बिघाडामुळे त्यांना दिल्लीतच थांबावे लागले होते. विमानाच्या उ•ाणपूर्व निरीक्षणादरम्यान तांत्रिक बिघाडाचा खुलासा झाला होता, ज्यानंतर अधिकाऱ्यांनी एअरबसच्या विमानाला उ•ाणापासून रोखले होते. बिघाड दूर झाल्यावर आणि विमानाला उ•ाणाची मंजुरी मिळाल्यावर ट्रुडो हे 12 सप्टेंबर रोजी कॅनडासाठी रवाना झाले होते. यादरम्यान भारताने ट्रुडो यांच्यासाठी विमान उपलब्ध करण्याचा प्रस्ताव दिला होता, परंतु कॅनडाने हा प्रस्ताव नाकारला होता.









