सकाळपासून एमपीटीच्या गेटवर आंदोलक युवकांचा ठिय्या
प्रतिनिधी/ वास्को
मुरगाव बंदरातून बाहेर पडणाऱया कोळसा आणि बॉक्साईट खनिज वाहतुकीविरूध्द मुरगावमधील युवकांनी गुरूवारी आंदोलन केले. त्यांनी बंदरातील गेट क्रमांक नऊवर ही वाहतूक रोखून धरली. त्यामुळे या वाहतुकदारांसमोर मोठी अडचण निर्माण झाली. कोळसा अणि खनिज प्रदुषणकारी असून त्यांची वाहतूक नवीन महामार्गावरून करण्यात यावी अशी मागणी करून आंदोलक युवकांनी वास्को शहरातून ही मालवाहतुक करण्यास विरोध दर्शवला. वास्को व मुरगावच्या आमदारांना हजर करण्याची मागणीही त्यांनी लावून धरली.
गुरूवारी सकाळी मुरगाव हेडलॅण्ड सडा भागातील बऱयाच युवकांनी एपीएच्या वास्कोतील गेट क्रमांक नऊ च्या ठिकाणी ठाण मांडून कोळसा आणि बॉक्साईट खनिजाच्या वाहतुकीविरूध्द आंदोलन सुरू केले. जोपर्यंत या समस्येवर तोडगा काढला जात नाही तोपर्यंत रस्ता मोकळा करण्यात येणार नाही असा पवित्रा या युवकांनी घेतला. त्यामुळे कोळसा व बॉक्साईटची वाहतूक करणारे मोठय़ा संख्येने ट्रक बंदरातच अडकून पडले.

परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस उपअधीक्षक सलीम शेख, पोलीस निरीक्षक कपिल नायक, राघोबा कामत यांच्यासह पोलिसांची मोठी कुमक आंदोलनस्थळी तैनात करण्यात आली होती. पोलीस अधीक्षकांनी आंदोलकांशी चर्चा करून कायदा व सुव्यवस्था बिघडू न देण्याचे आवाहन आंदोलकांना केले. मात्र, बंदरातील वाहतूक सुरू करण्यासाठी त्यांनी बळाचा वापर केला नाही. वास्कोचे आमदार दाजी साळकर आणि मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांना घटनास्थळी बोलवा. कोळसा आणि बॉक्साईटची वाहतूक प्रदूषण करणार नाही, ही माल वाहतूक हेडलॅण्ड सडय़ावरून नवीन महामार्गानेच होईल, वास्को शहरातून होणार नाही असे आश्वासन दोन्ही आमदारांनी आम्हाला द्यावे. तरच आम्ही वाहतुकीचा रस्ता मोकळा करू अशी आपली भूमिका स्पष्ट करून जवळपास शंभर युवक बंदरातील गेट बाहेर रात्रीपर्यंत ठाण मांडून होते. त्यामुळे कोळसा आणि बॉक्साईटवाहु एकही ट्रक गेटबाहेर पडू शकला नाही. सकाळी दहाच्या सुमारास हे युवक बंदराच्या गेटबाहेर एकत्र आले व वाहतूक रोखून धरली. त्यामुळे पोलिसांना धाव घ्यावी लागली.
महामार्ग खुला झाला तरी माल वाहतूक वास्को शहरातूनच
मागच्या वर्षी वरूणापुरी मांगोरहिल, गांधीनगर व्हाया बायणा उड्डाण पुल ते हेडलॅण्ड सडा असा चौपदरी महामार्ग खुला केलेला असताना आजही बंदरातील मालवाहतूक वास्को शहरातून होत असल्याने शहरातील वाहतुकीला भेडसावत असलेला धोका अद्यापही दूर झालेला नाही. वाहतुकीचा ताण आणि कोंडी अद्याप दूर झालेली नाही. शिवाय ही मालवाहतूक हवेत प्रदूषण निर्माण करीत असल्यानेही नागरिक त्रस्त बनलेले आहेत. त्यामुळे बंदरातून होणारी कोळसा आणि बॉक्साईट खनिज वाहतूक त्वरित हेडलॅण्ड सडामार्गे नवीन महामार्गाकडे वळवावी, या मालवाहतुकीव्दारे कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होणार नाही याची खबरदारी घेण्यात यावी अशी मागणी यावेळी समाजसेवक शंकर पोळजी, सुरज चोडणकर व इतर मोठय़ा संख्येने जमलेल्या युवकांनी केली. पोलिसांनी या समस्यांबाबत संबंधीत शासकीय अधिकारी व इतर संबंधीतांशी बैठक घेऊन चर्चा होणे आवश्यक असल्याचे आंदोलकांना पटवून दिले. परंतु ही समस्या सोडवण्याची इच्छा असल्यास वास्को व मुरगावच्या आमदारांनी आम्हाला तसे प्रत्यक्ष भेटून आश्वासन द्यावे अशी मागणी आंदोलकांनी कायम ठेवल्याने पोलीसही हतबल झाले.
बंदरात बॉक्साईट खनिजवाहू जहाज
रात्री उशिरापर्यंत वास्को व मुरगावचे आमदार आंदोलकांना भेटण्यासाठी आंदोलन स्थळी आले नव्हते. त्यामुळे कोळसा आणि बॉक्साईटवाहू शेकडो ट्रक बंदरामध्येच ही समस्या सुटण्याची वाट पाहात होते. आंदोलकांनी दिलेल्या माहितीनुसार मुरगाव बंदरात सध्या पावणे दोन लाख मेट्रिक टन एवढे बॉक्साईट खनिज साठा असलेले एक जहाज नांगरण्यात आलेले असून या खनिजाची वाहतूक ट्रकव्दारे कर्नाटक राज्यापर्यंत होते.
वास्कोचे आमदार दाजी साळकर यांनी यासंबंधी प्रसार माध्यमांकडे बोलताना सांगितले की नवीन महामार्ग उपलब्ध असताना आणि हा महामार्ग बंदरातील मालवाहतुकीसाठी वापरणे आवश्यक असताना शहरातून ही मालवाहतूक होणे चुकीचे आहे. अशा वाहतुकीला शहरातून येण्या-जाण्यास परवानगी मिळणार नाही. मुख्यमंत्र्यांशी आपण यासंबंधी चर्चा केलेली आहे, असेही साळकर यांनी स्पष्ट केले.









