संप मिटविण्याचे होत आहेत प्रयत्न, जनतेला वेठीस न धरण्याचे आवाहन
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
मार्गांवर अपघात केल्यास मोठी शिक्षा आणि जबर दंड अशा या, नव्या गुन्हेगारी कायद्यांमधील तरतुदींना विरोध करण्यासाठी ट्रकचालकांनी संप पुकारल्यामुळे देशभरात वाहतूक ठप्प झाली आहे. 10 राज्यांमधील ट्रक चालकांनी हा संप पुकारला असून त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. मंगळवार हा या संपाचा दुसरा दिवस होता. काही राज्यांमध्ये दूध आणि पेट्रोल-डिझेल यांची टंचाई आतापासूनच निर्माण झाली आहे.
महाराष्ट्र, मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, झारखंड, बिहार आदी राज्यांमधील ट्रकचालकांनी हा संप पुकारला आहे. महाराष्ट्रात, विशेषत: मुंबईत पेट्रोल पंपांवर लांबच लांब रांगा लागल्याचे दिसून आले. अनेक पेट्रोल पंपांवरील पेट्रोल संध्याकाळी संपल्यानंतर ग्राहकांना रिकाम्या हाताने परतावे लागले. मध्यप्रदेश आणि राजस्थानात येत्या एक दोन दिवसांमध्ये जीवनावश्यक वस्तूंची टंचाई निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत असून तेथील राज्यसरकारांनी पर्यायी व्यवस्था करण्यासाठी सज्ज राहण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत.
संप कशासाठी ?
केंद्र सरकारने नुकतीच संसदेत नव्या गुन्हेगारी कायद्यांसंदर्भातील विधेयके संमत करुन घेतली आहेत. या विधेयकांवर राष्ट्रपतींची स्वाक्षरी झाल्याने आता त्यांचे कायद्यांमध्ये रुपांतर झाले आहे. मार्गांवर मोठ्या वाहनांकडून अपघात झाल्यास चालकाला मोठी शिक्षा, तसेच मोठा दंड करण्याची तरतूद या कायद्यांमध्ये आहे. या तरतुदींना ट्रक चालक संघटनांचा विरोध आहे. या तरतुदी सौम्य करण्यात याव्यात अशी त्यांची मागणी आहे. ट्रक किंवा मोठ्या वाहनांचे चालक हे प्रामुख्याने गरीब कुटुंबातून आलेले असतात. अपघात घडल्यानंतर त्यांना मोठी शिक्षा केल्यास किंवा जबर दंड आकारला गेल्यास त्यांचे कुटुंबे उध्वस्त होऊ शकतात असे या संघटनांचे म्हणणे आहे. मात्र, या तरतुदी ट्रक किंवा मोठ्या वाहनांच्या चालकांना त्रास देण्यासाठी नसून त्यांच्यामध्ये जबाबदारीची जाणीव निर्माण व्हावी आणि योग्य प्रकारे वाहन चालविण्यासाठी त्यांना उद्युक्त करावे, यासाठी आहेत, असे केंद्र सरकारचे म्हणणे आहे. तर संप लवकर संपावा, अशी सर्वसामान्यांची मागणी आहे.
पेट्रोल, दूध, अन्न, औषधांची टंचाई
संप लांबल्यास मुख्यत: पेट्रोल, दूध, अन्नपदार्थ, धान्ये, भाजीपाला आणि औषधांची टंचाई निर्माण होणार आहे. त्यामुळे या पदार्थांचे दरही वाढण्याची चिंता आहे. हा संप सर्व ट्रक चालक संघटनांनी केलेला नाही. अनेक संघटना संपापासून दूर राहिलेल्या आहेत. तरीही जवळपास 25 टक्के ट्रकवाहतुकीवर परिणाम झाला आहे, असे बोलले जात आहे. संप मिटविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. अखिल भारतीय वाहन चालक संघटनेने अद्याप देशव्यापी संपाचे आवाहन केलेले नाही. केंद्र सरकारशी चर्चा करण्याची त्याची इच्छा आहे. शिक्षेचे प्रमाण कमी करावे, अशी त्यांची मागणी आहे. बहुतेक पेट्रोल पंपांवर दोन ते तीन दिवस पुरेल इतका साठा आहे. त्यामुळे इतक्यात टंचाई जाणवणार नाही. तोपर्यंत काही ना काही तोडगा निघणार आहे, असा आशावादही संघटनेच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. ट्रक चालकांचा विचारही केला जावा, असे त्यांचे म्हणणे आहे.
2000 पेट्रोल पंप बंद
पश्चिम भारत आणि उत्तर भारतातील 2,000 हून अधिक पेट्रोल पंपांवर पेट्रोलचा साठा संपल्या असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे मंगळवारी रात्रीपासून त्यांच्यापैकी कित्येक पंप बंद झाले आहेत. ट्रक चालक संघटनेने सरकारशी लवकर बोलणी करावीत, अशी मागणी अनेक ग्राहक संघटनांनी केली आहे.
कायद्यात काय आहे ?
ड बेजबाबदारपणे ट्रक किंवा मोठे वाहन चालवून अपघात करुन अन्य कोणाच्या मृत्यूस कारणीभूत झाल्यास वाहन चालकाला 5 वर्षांच्या कारावासाची शिक्षा
ड बेजबाबदारपणे वाहन चालून अपघात घडवून कोणाच्या मृत्यूस जबाबदार ठरल्यास आणि अपघाताची पोलिसांना किंवा दंडाधिकाऱ्यांना माहिती न देता पळून गेल्यास चालकाला 10 वर्षांच्या कारावासाची शिक्षेची तरतूद









