महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातून जाणाऱ्या मुंबई- आग्रा महामार्गावर भिषण आपघात होऊन 10 जण जागीच चिरडल्याची घटना घडली आहे. महामार्गावर भरधाव जाणाऱ्या कंटेनर ट्रकने चार वाहनांना धडक देऊन महामार्गाच्या कडेला असणाऱ्या हॉटेलमध्ये घुसल्याने किमान 10 लोक जागीच ठार आणि 20 हून अधिक जखमी झाले आहेत. मुंबईपासून 300 किमी अंतरावर असलेल्या धुळ्यातील मुंबई-आग्रा महामार्गावरील पलासनेर गावाजवळ सकाळी 10. 45 वाजता हा अपघात झाला.
घटनास्थळावरून पोलीस अधिकाऱ्याने सांगितलेल्या माहीतीनुसार, ट्रकचे ब्रेक निकामी झाल्यामुळे चालकाचे ट्रकवरचे नियंत्रण सुटले. भरधाव कंटेनरने दोन मोटारसायकल, एक कार आणि दुसऱ्या कंटेनरला मागच्या बाजूने धडक दिली. त्यानंतर हा कंटेनर महामार्गावरील बसस्थानकाजवळील एका हॉटेलमध्ये घुसून उलटला. या अपघातात किमान 10 लोक ठार झाले असून 20 हून अधिक जखमी झाले असल्याचे स्थानिक पोलीस अधिका-याने सांगितले. हा ट्रक मध्यप्रदेशातून धुळ्याकडे जात होता.
मृत्युमुखी पडलेल्य़ा लोकांमध्ये महामार्गालगत बसची वाट पाहत थांबलेल्या लोकांचाही समावेश असल्याचे पोलीसांनी सांगितले. तर जखमींना शिरपूर आणि धुळे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे.