कराड :
बिअरच्या बाटल्यांच्या साठ्याची वाहतूक करणाऱ्या ट्रकला अन्य एका ट्रकची धडक बसल्याने नांदलापूर हद्दीत अपघात झाला. अपघातात ट्रकचालकासह दोघे जखमी झाले. जखमींच्या मदतीला अनेकजण धावले पण काहींनी मदतीचा नाद सोडून बिअरच्या बाटल्या पळवून नेण्याचा प्रकार केल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले. बिअरच्या बाटल्या पळवण्यात हायवेवरून जाणाऱ्या अनेक वाहनधारकांचा समावेश होता. काही स्थानिक नागरिकांच्या मदतीमुळे जखमींना वेळेत रूग्णालयात दाखल करण्यात आले.
पुणे-बेंगळूरू महामार्गावर सोमवारी सकाळी घडलेल्या भीषण अपघाताने एक वेगळेच चित्र पाहायला मिळाले. कोल्हापूरच्या दिशेने बिअरच्या बाटल्यांनी भरलेला ट्रक जात असताना नांदलापूर गावाजवळ पाठीमागून येणाऱ्या कंटेनरने जोरदार धडक दिली. धडकेचा आवाज इतका प्रचंड होता की ट्रक रस्त्याच्या कडेला घसरून थांबला आणि बिअरचे बॉक्स महामार्गावर अक्षरश: पसरले.
अपघात होताच गर्दी जमली. काहींनी मदतीसाठी पुढाकार घेत जखमींना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केला तर काहींनी मदत करण्याचे सोडून बिअरच्या बाटल्या उचलून नेण्याचा सपाटा लावला. बिअरच्या बाटल्यांचा हा ‘मोफत माल’ घरी नेण्यात आला.
दरम्यान, अपघातात ट्रकचालक आणि क्लिनर जखमी झाले असून, कदम क्रेनचे चालक सुनील कदम यांनी तत्परता दाखवत दोघांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. मात्र, मोठ्या प्रमाणात बिअरच्या बाटल्या गायब झाल्या होत्या.








