प्रतिनिधी /फोंडा
ढवळी – फर्मागुडी बगलरस्त्यावर बांदोडा येथे चढण चढणारा मालवाहू अवजड ट्रक रिव्हर्समध्ये अचानकपणे खाली उतरला व एका कारचालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठी अपघात टळला. मंगळवारी सकाळी 10 वा. सुमारास ही घटना घडली. ताबा सुटलेला हा ट्रक रस्त्याच्या मधोमध उलटल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. त्यानंतर मडगाव पणजी व्हाया फोंडा ही वाहतूक सर्व्हीस मार्गाने वळविण्यात आली. जीजे 01 जेटी 2742 या क्रमांकाचा हा मालवाहू ट्रक लाकडी दरवाजे व चौकटी घेऊन वेर्णाहून हरियाणाकडे निघाला होता. ढवळी बगलरस्त्याने फर्मागुडीकडे जाताना काशिमठ बांदोडा येथील मैदानाच्या जरा पुढे लागणाऱया चढणीवर असताना ट्रकचे प्रेशर पाईप फुटले. चालकाला काही कळण्याच्या अगोदर पुढे जाणारा ट्रक रिव्हर्समध्ये खाली उतरु लागला. प्रसंगावधान राखून ट्रक चालकाने कॅबिनमधून बाहेर उडी घेतली व आपले जीव वाचवले. मात्र रिव्हर्समध्ये खाली उतरणारा ट्रक पाहून पाठिमागून येणाऱया एका कारचालकाने आरडाओरडा करीत तेथून जाणाऱया इतर वाहनचालकांना सतर्क केले. तोपर्यंत हा ट्रक वेगात खाली उतरला व साधारण पन्नास मिटरपर्यंत उतरणीवर खाली येऊन रस्त्याच्या मधोमध उलटला. या अपघातात ट्रकची बरीच नुकसानी झाली तरी कारचालकाने दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे इतर वाहनांना वेळीच धोक्याची कल्पना आली व एक मोठी दुर्घटना टळली.









