मृतांमध्ये 3 मुलांचा समावेश
वृत्तसंस्था/ दतिया
मध्यप्रदेशच्या दतिया एक मिनी ट्रक नदीत कोसळला आहे. मिनी ट्रकमधून सुमारे 54 जण प्रवास करत होते. या दुर्घटनेत 5 जणांचा मृत्यू झाला असून यात 3 मुलांचा समावेश आहे. तर 12 जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही दुर्घटना बुहारा गावात बुधवारी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. पूल ओलांडतेवेळी चालकाने नियंत्रण गमाविल्याने हा ट्रक नदीत कोसळला होता.
टीकमगढ येथील जतारा गावातील विवाहसोहळ्यात सहभागी होण्यासाठी या ट्रकमधून लोक प्रवास करत होते. राज्याचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 4 लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे. तर जखमींना प्रत्येकी 50 हजार रुपयांची मदत करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.









