पुणे-बेंगळूर महामार्गावरील यमगर्णीनजीकचा प्रकार : निपाणी बसवेश्वर चौक पोलिसांची धावपळ
वार्ताहर /निपाणी
सरत्या वर्षाला निरोप देत नववर्षाचे स्वागत करत अनेकांनी रविवारची रात्र जागवली. सोमवारी सकाळचा सूर्योदय झाला. नववर्षाचे स्वागत करत प्रत्येकजण मोठ्या उत्साहाने वेगवेगळे संकल्प घेऊन आपापल्या कामात व्यस्त होत गेले. अनेकजण नववर्षाच्या शुभेच्छा आपले पै-पाहुणे, मित्रपरिवार यांना देण्यात गर्क होते. काहीजण प्रवासाच्या निमित्ताने घराबाहेर देखील पडले होते. याचवेळी सकाळी 8 वाजता ट्रकचालकांनी अचानकपणे यमगर्णीनजीक सहारा हॉटेलसमोर पुणे-बेंगळूर महामार्गावर टायर टाकून चक्काजाम केला. अघोषित या महामार्ग बंदमुळे अनेकांची त्रेधा उडाली. सुमारे तासभर कोणाला काहीच समजत नव्हते. सुमारे तासभर सुरू असलेल्या आंदोलनामुळे लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्या. वाहतूक ठप्प झाली. यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत अघोषित आंदोलन रोखले आणि वाहतूक सुरळीत केली. केंद्र शासनाने नुकतेच नवे कायदे बनवताना हिट अँड रन अंतर्गत देखील कायदा तयार केला आहे. याला मंजुरी देखील घेतली आहे. या कायद्यांतर्गत अपघातानंतर जर वाहनचालक घटनास्थळावरून पळून गेल्यास संबंधित वाहन चालकाला 10 वर्षांची शिक्षा व सुमारे 7 लाख रुपये दंड अशी तरतूद करण्यात आली आहे. अपघातस्थळी थांबल्यास 7 वर्षे शिक्षा व 5 लाखाचा दंड अशी तरतूद केली आहे. हा कायदा म्हणजे रोजंदारी करणाऱ्या ट्रकचालकांसाठी धोक्याची घंटा आहे. हा कायदा मागे घेण्यासाठी संपूर्ण देशभरातून ट्रकचालक व मालवाहतूकदार यांनी अनेक ठिकाणी संप सुरू केला आहे.
याच आंदोलनाला पाठबळ देत निपाणीनजीक असणाऱ्या
हॉटेल फ्लोरासमोर परराज्यातून आलेल्या ट्रकचालकांनी अचानकपणे चक्काजाम केला. याविषयी प्रशासनाकडून घ्यावी लागणारी कोणतीही परवानगी त्यांच्याकडे नव्हती. अशा या परिस्थितीत पुकारले गेलेले आंदोलन अनेकांच्या अडचणीचे ठरले. असे अघोषित महामार्ग बंदचे आंदोलन पुकारता येणार नाही, अशी समज देत घटनास्थळी धाव घेऊन बसवेश्वर चौक पोलिसांनी ट्रकचालकांचे आंदोलन थांबवले. यावेळी पोलिसांनी बंदोबस्त ठेवत काही ट्रकचालकांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली. दरम्यान तासभर झालेल्या चक्काजाम आंदोलनामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.









