पेडणे पोलिसांनी भुसावळ महाराष्ट्र येथे केली कारवाई
पेडणे : सुकेकुळण धारगळ येथे 16 जून 2023 रोजी ट्रकने धडक दिल्याने झालेल्या अपघातात शेमेचे आडवण येथील नामदेव कांबळी यांचा जागीच मृत्यू झाला होता. या अपघातास कारणीभूत ठरलेला ट्रक चालक बसंत यादव(मूळ झारखंड) याला पेडणे पोलिसांनी अखेर भुसावळ महाराष्ट्र येथून ताब्यात घेऊन अटक केली. पेडणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातानंतर संशयित ट्रक चालक पळून गेला होता. पेडणे पोलीस त्याच्या शोधात होते. अपघात होऊन पाच दिवस उलटले तरी संबंधित ट्रक चालक मोकाटच होता. त्यामुळे काँग्रेसने पेडणे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले होते. मंगळवारी पेडणे पोलीस स्थानकावर काँग्रेस पक्षाच्या वतीने धडक देत पेडणे पोलीस निरीक्षक सचिन लोकरे यांना धारेवर धरले होते. अखेर पेडणे पोलिसांना मंगळवारी संशयित ट्रक चालकाला अटक करण्यात यश आले.









