प्रतिनिधी/ बेळगाव
मार्केट यार्ड परिसरात शुक्रवारी सायंकाळी झालेल्या विचित्र अपघातात कुसमळी, ता. खानापूर येथील एक युवक गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर खासगी इस्पितळात उपचार करण्यात येत आहेत.
जोतिबा राजाराम गायकवाड (वय 38) राहणार कुसमळी असे त्याचे नाव आहे. शुक्रवार दि. 13 जून रोजी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास मार्केट यार्ड येथील एका अडत दुकानासमोर ही घटना घडली आहे. वाहतूक उत्तर विभाग पोलीस स्थानकात शनिवारी ट्रकचालकाविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
जोतिबा हा गुड्स वाहनाचा चालक आहे. एका अडत दुकानासमोर कांदे-बटाटे ने-आण करण्यासाठी दोन गुड्स वाहने उभी करण्यात आली होती. सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास दोन्ही वाहनांच्या मधून जोतिबा आपल्या वाहनात बसण्यासाठी जात होता. त्यावेळी एका भरधाव ट्रकची गुड्स वाहनाला धडक बसली. एकमेकाला लागून ही दोन गुड्स वाहने उभी होती. त्यामुळे ट्रकच्या ठोकरीनंतर या दोन्ही वाहनांमध्ये सापडून जोतिबा चिरडला गेला.









